तेल्हारा (प्रतिनिधी)-सलूनची दुकाने सुरू करा अथवा सलून व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजाला आर्थिक पॅकेज जाहीर करा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या तेल्हारा तालुक्याच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही इमेल करण्यात आले आहे.
या निवेदनामध्ये म्हटले आहे, की जिल्ह्यासह राज्यातील सलून दुकाने व ब्युटी
पार्लरची दुकाने तातडीने सुरू करावी, अन्यथा परंपरिक सलून व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजावर उपासमारीची वेळ येणार हे निश्चित आहे. शासन व प्रशासन यांनी दिलेल्या नियम व अटीनुसार सलून व्यावसायिकांनी प्रामाणिक काम केले. त्यांच्यामुळे
कोठेही कोरोना संसर्ग झालेला नाही. व्यवसाय सुरू नसल्यामुळे उधारी-उसनवारी तसेच कर्जाचा बोजा व्यावसायिकांवर आला आहे.
अचानक सलून बंदच्या निर्णयामुळे व्यावसायिकांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे. त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी इतर साधन नाही. 90 टक्के लोकांना शेती नाही. दुकानेही भाडोत्री आहेत. भाडे वीजबिल, घरचा खर्च, औषधाचा खर्च, मुलांच्यास शिक्षणाचा खर्च कोठून करायचा असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. त्यामुळे उपासमार रोखण्यासाठी येत्या आठ जूनपासून सलून व्यवसाय सुरू करावा, अन्यथा सलून व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजातील प्रत्येक कुटुंबाला
प्रतिमहिना पाच हजारांप्रमाणे तीन महिन्यांचे एकूण 15 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावेत, प्रत्येक सलून व्यावसायिकाला 50 लाखांचे विमा संरक्षण, तसेच व्यवसाय करताना स्वतःबरोबरच ग्राहकाच्या संरक्षणासाठी लागणारे पीपीई किट, मास्क व सॅनिटायझर, फेसशिल्ड अशा स्वरूपाचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यवसाय बंद राहिल्यामुळे उपासमारीने नाभिक समाज असाही मृत्यूच्या दारात जाणार आहेत. काम बंद झाल्या मराणीशिवाय पयार्य राहणार नाही. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा शासनाला जाग आणण्यासाठी संपूर्ण समाज अन्नत्याग करेल तसेच पहिल्या पावसात जलसमाधी घेईल. त्याला संपूर्ण शासन जाबदार राहिल असेही त्यात म्हटले आहे. यावेळी विलास बेलाडकर गजानन कान्हेरकर नितिन सिध्दमुखे विजय राजुस्कर गजानन राजुस्कर राहुल राजुस्कर संदिप रूद्रकार शुभम रूद्रकार अक्षय रूद्रकार सागर जऊलकार मंगेश शिगणारे विठ्ठल दांगटे अशोक पिंपळकार श्याम आमोदकर छोटु रूद्रकार हरीष लिलडे गोपी तुनवाल गजानन माझोडकार यांच्यासह संपुर्ण नाभिक दुकानदार यांच्या निवेदनावर सह्या आहेत तालुकाध्यक्ष, शहरप्रमुख व पदाधिकारी पुढील कार्यवाही व आंदोलनाची दिशा ठरविण्यावर मार्ग कसा काढायचा यासाठी प्रयत्न करत आहेत.
तमिळनाडू व दिल्ली सरकारने निर्णय घेऊन त्या-त्या राज्यात सलून व्यवसाय सुरू केला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही सुरू करावा, अन्यथा कर्नाटक राज्याप्रमाणे आर्थिक पॅकेज नाभिक कुटुंबांना जाहीर करावे.
विलास बेलाडकर तेल्हारा तालुका अध्यक्ष अखिल भारतीय जिवा सेना