अकोला,दि.५ – जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र 4.80 लाख हेक्टर करीता 80830 मे. टन रासायनिक खते पुरवठाबाबत कृषि आयुक्तालय, पुणे यांच्याकडून आवंटन प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये 29646 मे. टन खताचा साठा उपलब्ध झालेला आहे. ही खते तालुकास्तरावरील विक्रेत्यांपर्यंत व तेथून शेतकरी गटांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी खत विक्रेत्यांकडे गर्दी करु नये असे आवाहन जिल्हा कृषि विकास अधिकारी मुरली इंगळे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती यांनी रासायनिक खताचा पुरवठा ग्रामीण व तालुकास्तरावरील खत विक्रेत्यापर्यंत तात्काळ पोहोच करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार रासायनिक खताचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे मार्गदर्शक सुचनानुसार शेतकऱ्यांना शेतकरी गटामार्फत बांधावर बियाणे व खते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषि सहाय्यक , कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, पंचायत समिती व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे रासायनिक खते खरेदी करीता जिल्हास्तरावरील, अकोला मनपा क्षेत्रातील खत विक्रेत्याकडे अनावश्यक गर्दी करू नये. भौतिक अंतर राखुन सर्वतोपरी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.