बोर्डी(देवानंद खिरकर)- कोरोनाच्या संकटकाळात सर्व पारंपरिक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असताना, लॉकडाउनमध्ये कारागिरांच्या हाताला काम नसल्याने अकोला जिल्ह्यातील सावरा येथील सुतारकाम करणारे कुशल कारागीर नरेश पुनकर यांनी नव्या पिढीला पारंपरिक शेती साधने, कृषी अवजारे जवळून पाहता यावी.
या उद्देशाने लॉकडाउनच्या काळात लाकडापासून निर्मित बैलगाडी, तिफन, दमनी, शंकरपटामधील रेंगी, पेरणीयंत्र, वखर,डवरे, कुदळी, विळा, पारंपरिक कंदील, व रोज शेतीमध्ये उपयोगाची सर्व शेती अवजारासह विविध 40 प्रकारच्या पारंपरिक वस्तू हुबेहूब तयार केल्या असून, आजच्या नवतंत्रज्ञानाच्या युगात लोकांना पारंपरिक वस्तूचा विसर पडत असताना नवीन पिढीला ह्या वस्तू जवळून पाहता याव्यात शेतकऱ्यांचे जीवन समजावे या उद्देशाने नरेश पुनकर यांनी तयार केलेल्या वस्तूं शाळांना सुट्ट्या असल्याने गावातील बच्चे कंपनीसाठी कुतूहलाचा विषय बनला असून या पारंपरिक वस्तू पाहण्यासाठी मुले पुनकर यांच्या घरी येऊन सामाजिक अंतर राखत कुतूहलाने पाहत आहेत.
नरेश पुनकर यांचा पारंपरिक व्यवसाय सुतारकाम काम आहे, कुशल कारागीर असल्याने लाकडाच्या वस्तू, फर्निचर तयार करण्यासाठी त्यांना गावोगावी बोलावल्या जायचे, मात्र अचानक लॉकडाउन सुरू झाल्याने हातातील सर्व कामच बंद झाले. अशावेळी निर्माण झालेल्या समस्येला संधीत रूपांतरित करीत नरेश पुंडकर यांनी सर्व पारंपरिक वस्तू तयार करण्याचा निश्चिय केला व बघता बघता छोट्या स्वरूपातील सुंदर पारंपरिक वस्तू त्यांनी 50 दिवसात तयार केल्यात ह्या वस्तू दिसायला अंत्यत सुंदर असून हुबेहूब शेतीतील अवजारांची प्रतिकृती साकारत असल्याने परिसरात कौतुक होत आहे.