अकोला,दि. १ – जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडायची आहे, संसर्ग रोखायचा आहे. जिल्हा प्रशासन, राज्य शासन आणि केंद्र शासन हे ज्या ज्या उपाययोजना करीत आहेत. त्या सर्व उपाययोजना ह्या कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठीच आहे, त्यातूनच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नेत्यांनी अकोल्यात जनता कर्फ्यू ही संकल्पना मांडण्यात आली. आता सहा दिवस आपल्या शहरासाठी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पालन करावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे उद्योजक व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
अकोला इंडस्ट्रिज असो. पदाधिकाऱ्यांशी चर्चा
यासंदर्भात पालकमंत्री ना. कडू यांनी एम आय डी सी येथे अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अकोला इंडस्ट्रीज एसोसिएशन चे अध्यक्ष उमेश मालू ,उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल, नरेश बियानी, सचिव नितिन बियानी, सह सचिव निखिल अग्रवाल,कोषाध्यक्ष आशीष खंडेलवाल, तसेच केशव खटोड, जय बांगड, प्लॉट ओनर एसोसिएशन एमआईडीसीचे अध्यक्ष सुरेश काबरा, सचिव संजय सिंह ठाकुर, एमआईडीसी कार्यकारी अभियंता जलतारे आदी उपस्थित होते. एम.आय. डी. सी. अकोला येथील बहुतांश डाळ मिल साठी लागणारा कामगार वर्ग हा धारणी येथून येत असतो. तो आता येथे नसल्याने या कामगारांना येथे येण्या सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत लवकरात लवकर कारवाई करुन डाळ मिल उद्योग सुरु होण्याबाबत प्रयत्न करु असे आश्वासन ना. कडू यांनी दिले. तसेच अकोला शहरातून मजुरांना एम आय डी सी भागात येण्यास अडचणी निर्माण होऊ नये यासाठी उद्योजकांनी आपल्या कामगारांना कारखाना परिसरातच राहण्याची व जेवणाची सोय करावी. हे सगळं आपण केवळ संसर्ग रोखण्यासाठी करत आहोत असे ना. कडू यांनी सांगितले. विशेषतः जे कामगार प्रतिबंधित क्षेत्रातून ये जा करीत असतील तर त्यांना कामावर बोलावू नका अथवा त्यांना इथच रहायची व्यवस्था करुन द्या, असे ना. कडू यांनी सांगितले. परस्पर संपर्कातून होणाऱ्या फैलावाबाबत जागरुक राहुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ना. कडू यांनी उद्योजकांना केले आहे.
व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
यासंदर्भात पालकमंत्री ना. कडू यांनी शहरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विधान सभेचे सदस्य आ. नितीन देशमुख, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार उपस्थित होते. तसेच पेट्रोलपंप चालक संघटनेचे राठी, रिटेल ग्रेन मर्चंट असोसिएशनचे विजय तिवारी, महात्मा फुले भाजीपाला व्यापारी संघटनेचे सज्जाद हुसेन, फ्रुट मर्चंट असोसिएशनचे मोहम्मद युनुस, नगरसेवक साजिद खान पठाण तसेच रवी साधवानी, श्याम अग्रवाल, अरविंद पाटील, प्रविण वानखडे, विपुल दोशी, सुनिल पोतदार, राजेंद्र शेट्टी आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन व संबंधित उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी अकोला शहरातील फैलाव रोखण्यासाठी जनता कर्फ्युचे काटेकोरपालन करावे, असे आवाहन ना. कडू यांनी केले. हा सहा दिवसांचा कालावधी आपल्या शहराच्या भल्यासाठी द्यायचा आहे.यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या झालेल्या चर्चेच्या वेळी मांडल्या.
जिल्हा प्रशासनाकडून घेतला आढावा
आज पालकमंत्री ना. बच्चू कडू जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विधान परिषदेचे सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरात सुरु असलेली आरोग्य तपासणी त्यातून आढळणारे संदिग्ध रुग्ण, त्यांच्यातील संस्थागत अलगीकरणासाठी व चाचण्यांसाठी नेण्यात आलेले व्यक्ती, त्यांची निवास, भोजन व अन्य आवश्यक सुविधांची माहिती त्यांनी घेतली. प्रशासकीय यंत्रणेने संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. अलगीकरणातील रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याविषयी पालकमंत्री ना.कडू यांनी प्रशासनास निर्देश दिले.