अकोला,दि.२२ – कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर शेतकऱ्याला सन २०२०-२१ खरीप हंगामात अल्पभुधारक सर्वसाधारण शेतकऱ्यांना कपाशी बी.जी.-२ बियाणे लागवडीसाठी ९० % अनुदान योजनेस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देवुन त्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभाताई भोजने आणि कृषि व पशुसवंर्धन सभापती पंजाबरावजी वडाळ यांच्या पुढाकाराने सन २०२०-२१ खरीप हंगामात अल्पभुधारक सर्वसाधरण शेतकऱ्यांना कपाशी बी.जी.-२ बियाणे लागवडीसाठी ९० % अनुदान योजनेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
ही योजना अकोला जिल्ह्यातील सर्वसाधारण अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी असुन प्रति लाभार्थी कमाल एक एकरासाठी कपाशी बियाणे दोन पाकीट याप्रमाणे मर्यादीत राहील. यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२, ८ अ चा उतारा, आधारकार्ड सलंग्न बँक खाते पुस्तिकेच्या पहील्या पानाची सत्यप्रत , अपंग असल्यास तसे अधिकृत प्रमाणपत्र अर्जासोबत ग्रामसेवक ग्राम पंचायत मार्फत पंचायत समितीला सादर करावे. पंचायत समिती स्तरावर छाननी करुन पात्र लाभार्थ्यांच्या यादीतुन कृषि समिती जिल्हा परिषद अकोला दवारे लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी अधिकृत परवानाधारक निविष्ट विक्रेत्यांकडुन संकरीत कपाशी बी.टी. बियाणे बी.जी.II खरेदी करुन विहीत खरेदी पावती कृषि विभागाकडे सादर केल्यानंतर ९० % अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी) दवारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. पेरणीनंतर कपाशी क्षेत्राची तपासणी करण्यात येईल. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी दि.५ जून पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, कृषि व पशुसवंर्धन समिती पंजाबरावजी वडाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, कृषि विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे यांनी केले आहे.
अधिक वाचा: विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा