बुलडाणा दि. 21 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभर 31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. राज्यात राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनबाबत आदेश लागू केले आहे. हे सुधारीत आदेश जिल्ह्यात 22 मे 2020 पासून 31 मे 2020 पर्यंत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लागू केले आहेत. सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 5 या वेळेत कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उघडी ठेवण्यास परवानगी आहे. दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान 6 मीटरचे अंतर ठेवावे, तसेच एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेवू नये. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनीटायझेशन या अटींसह आंतर जिल्हा बस वाहतूकीस 50 टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी आहे. जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. त्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
1. जिल्ह्यात ह्या सेवा सुरू राहणार :
जिवनावश्यक वस्तू विक्री ठिकाणे धान्य व किराणा, बेकरी, फळे व भाजीपाला, कृषि संबंधीत सर्व दुकाने, दुधाची दुकाने, पेट्रोल पंप, अंडी, मांस, मच्छी, पशुखाद्य व चारा विक्री दुकाने, रूग्णालये, नर्सिंग होम, क्लिनीक, टेलिमेडीसीन्स सुविधा, केमिस्ट, औषधी दुकाने, वैद्यकीय साहित्याचे दुकाने, सर्व आरोग्य सेवा, वैद्यकीय प्रयोगशाळा व संग्रह केंद्रे, पशुवैद्यकीय रूग्णालये, दवाखाने, क्लिनीक, पॅथोलॉजी, औषधी विक्री व पुरवठा, रूग्णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय आरोग्याच्या पायाभूत सोयी सुविधांचे बांधकाम, डायग्नोस्टीक रूग्णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म, कच्चा माल व मध्यवर्ती घटकांचे युनीट, शेतकऱ्यांद्वारे शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारी थेट विपणन हमी भावाने खरेदी करणाऱ्या यंत्रणांची कामे सुरू राहतील. कृषि उत्पन्न बाजार समित्या, शेतीविषयक यंत्र व त्यांचे सुटे भाग विक्री दुकाने, दुरूस्ती करणारे दुकाने, शेतीसाठी भाडेतत्वावर अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स, रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके यांचे उत्पादन वितरण व विक्री करणारी कृषि सेवा केंद्र, गॅस एजन्सी, इमारतींची बांधकामे सुरू राहतील. बँका, सर्व एटीएम, एलआयसी, पोस्ट ऑफीस संबंधीत सर्व सेवा सुरू राहतील. तसेच केशकर्तनालये, स्पा सुरू राहतील.
विवाह समारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीने करता येईल, यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी राहील. मनरेगाची कामे करता येतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतूक वितरण व साठवणूकीस परवानगी राहील. वस्तू व सेवांसाठी ऑनलाईन सुविधांचा वापर व घरपोच डिलीवरी देता येईल. शासनाने ठरवून दिलेल्या किमान अंतरासह महामार्गावरील ट्रक दुरूस्तीचे दुकाने सुरू राहतील. खाजगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे.
इलेक्ट्रीशीयन, संगणक अथवा मोबाईल दुरूस्ती, वाहन दुरूस्ती, नळ कारागीर, सुतार यांच्या सेवा सुरू राहतील. नगर पालिका क्षेत्राचे हद्दीबाहेर व ग्रामीण भागातील उद्योग, बांधकामास परवानगी आहे. मान्सूनपुर्व संबंधीत सर्व कामे सुरू राहतील. त्याचप्रमाणे एका व्यक्तीसह दुचाकी, चालकासह दोन व्यक्तींसाठी थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांना परवानगी राहील.
2. जिल्ह्यात ह्या सेवा प्रतिबंधीत असणार आहे :
वैद्यकीय कारणा शिवाय किंवा या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी, अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यातून प्रवासाच्या वाहतुकीस पुर्णपणे बंदी असेल, सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहील, सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार व तत्सम, व्यायामशाळा व सामुहिक खेळांसाठी क्रीडा कॉम्प्लेक्स बंद राहतील, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे भविकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे आदी बंद राहतील. पानटपरी, चहाचे स्टॉल्स, उपहारगृहे बंद राहतील.
तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे नियम : कामाच्या ठिकाणी हॅण्ड वॉश, सॅनीटायझर, प्रवेश व जाण्याच्या ठिकाणी ठेवावे. तसेच कामाच्या ठिकाणी नियमित सॅनीटायझेशन, नागरिकांच्या प्रवेश ठिकाणी सर्व सुरक्षा बाळगावी. सोशल डिस्टसिंग, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल ठेवावा.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.