कोविड- 19 अर्थात कोरोनाचे संपूर्ण जगावर मोठे संकट कोसळलेले असतांना भारतात देखील प्रशासना कडून सोशल डिस्टन्स चे अवाहन वारंवार करण्यात येत आहे. भारतात कोरोना बाधितांची नगण्य संख्या असतांना लॉकडाउनच्या सुरवातीलाच ‘जनता कर्फ्यू’ चा ट्रेलर झाला नंतर लॉकडाऊन झाले तरी देखील काही बेजबाबदार लोकांनी जीवनावश्यकच्या नावाखाली अनावश्यक भटकंती केली हे मान्यच करावे लागेल.मात्र आता परिस्थिती पूर्वी सारखी राहिलेली नाही दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा कहर वाढत असून दररोज हजारच्या पटीने वाढ होतांना दिसत आहे.त्यामळे आता खऱ्या अर्थाने ‘जनता कर्फ्यू’ ची आवश्यकता आहे.
जगात स्वतःला महासत्ता समजणाऱ्या देशांनी कोरोना संकटाच्या समोर गुढगे टेकवल्याचे आपण पाहत आहोत.उत्तम अशी आरोग्य यंत्रणा या देशांकडे आहे तरी देखील एका व्हायरस समोर हतबल होतानांचे चित्र संपूर्ण जग पाहत आहे.महामारीत शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यावर आपण आपल्या देशात सामान्य नागरिकांचे काय हाल झाले व होत आहे हे पाहत आहोत.यापुढेही बेजबाबदार लोकांच्या नाकर्तेपणामुळे कोरोना संसर्ग वाढत राहिला आणि शासनाने लॉकडाऊन वाढविला तर यात आपल्या देशाचे सर्वच स्तरातून मोठे नुकसान होऊ शकते हे नाकारता येणार नाही.
देशातील गरीब जनता जी रोज कमावून आपल्या दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करते त्या जनतेचे हाल काय असतील याचे चित्र डोळ्या समोर उभे राहिले तरी अंगावर काटे उभे राहतात.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तीन चार दिवसातच सामाजिक संस्था,प्रशासनाला पुढे येऊन गरजूंची भूक भागवावी लागली अशी परिस्थिती असतांना अजून किती दिवस लॉकडाऊनचा सामना करावा लागेल असा प्रश्न मनात घेऊन सामान्य नागरिक एक एक दिवस काढत आहे.
कोरोना संसर्ग वाढत असल्याने शासनाची लॉकडाऊन,’जनता कर्फ्यू’ आवाहन करणे आवश्यता होऊ लागली आहे. शासनाकडून लॉकडाऊन बाबत “तारीख पे तारीख” मिळाल्यास आपलेच नुकसान आहे.म्हणूनच कोरोनाची साखळी तोडायची असेल तर ते शासनाच्या हातात नसून या देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या हातात आहे.आपणच कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला हद्दपार करू शकतो त्यानंतर आपोआप लॉकडाऊन,’जनता कर्फ्यू’ यातून आपली सुटका होईल. भारतीय नागरिकांना संविधानाने जसे अधिकार दिले आहेत त्याच प्रमाणे कर्तव्य देखील दिले आहे.आज पर्यंत आपण अधिकार गाजवले आहे पण आता वेळ कर्तव्य निभवायची आहे.
आपण आता आपले कर्तव्य म्हणून शासनाने आपल्या भल्यासाठी दिलेले दिशा निर्देश पाळून व अकोल्यातुन कोरोना हद्दपार होईपर्यंत स्वतःला ‘जनता कर्फ्यू’ लागू करेल तसेच खरोखर आवश्यक गोष्टीसाठीच घरा बाहेर पडेल अशीच मनाशी खूणगाठ बांधणे आवश्यक आहे तरच आपण ही कोरोना सोबतची लढाई जिंकणार आहोत.
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या आता जलद गतीने वाढत आहे हे आपण रोज पाहत आहोत त्यामुळे अकोलकर खऱ्या अर्थाने आता ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याची गरज आहे.
‘जनता कर्फ्यू’ पाळूया..!
कोरोना लढा जिंकूया..!
निलेश र जवकार
(मुख्य संपादक)
९९२२३९०३०८
Sir kahi kamacha nahi hai he लाँकडाउन karan aaplya akola t
zati wad khup hai