पारस – पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रात काम करीत असलेले तीन कंत्राटी कामगार भाजल्याची घटना ९ मे रोजी घडली. यामध्ये तिन्ही मजूर भाजले असून, त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी या सर्व मजुरांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पारस प्रकल्पात गत काही दिवसांत हा दुसरा अपघात आहे. दरम्यान, सुरक्षा साधनांभावी कंत्राटी कामगारांना जीव धोक्यात टाकून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.
पारस औष्णिक वीज प्रकल्पात अंकुर एंटरप्रायजेसचे मोहन भवाने, विशाल वेरुळकर, जावेद पठाण हे ९ मे रोजी बॉयलरच्या फर्नेसमध्ये मॅन्युअल पोकिंग करीत होते. यावेळी तिन्ही कामगार भाजल्या गेले. त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिन्ही कामगारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना १० मे रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. याबाबत औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या या विभागाचे कार्यकारी अभियंता केंडे यांनी सांगितले की, या कामगारांना हॅण्डग्लोव्हज, हेल्मेट, शूज, बेल्ट व (थर्मल वियर) पीपी किट देण्यात आली होती.