नवी दिल्ली : लॉक डाऊनमुळे भारतातील वाहन कंपन्या प्रचंड अडचणीत आल्या आहेत. एप्रिल महिन्यामध्ये मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ह्युंदाई या कंपन्यांची विक्री शून्य झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सरकारने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार केलेले आहेत. यामध्ये काही उद्योगांना अंशत: काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये वाहन कंपन्यांचाही समावेश आहे. मात्र वाहन कंपन्या आपल्या सुट्या भागासाठी इतर अनेक छोट्या कंपन्यावर अवलंबून असतात. या सर्व कंपन्या वेगवेगळ्या झोनमध्ये आहेत. त्यामुळे वाहन कंपन्या सुरू होण्यासाठी या सर्व कंपन्या एकत्रितपणे सुरू होण्याची गरज आहे. ही परवानगी सरकारने शक्य तितक्या लवकर द्यावी असे आवाहन या उद्योगाने केले आहे.
मारुती सुझुकी इंडिया या कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यामध्ये आम्हाला एकही कार विकत आली नाही. कारण देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे उत्पादनाबरोबरच वितरकांचे काम ठप्प झाले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मारुती-सुझुकी इंडिया कंपनीने 1लाख 20हजार कार विकल्या होत्या. आगामी परिस्थितीबाबत काहीच भाष्य करता येत नाही असे त्यांनी सांगितले.
एकूण कार कंपन्यांची विक्री एप्रिलमध्ये शून्यावर आली असली तरी गेल्या वर्षी सर्व कंपन्यांनी एप्रिल महिन्यामध्ये 28 लाख विकल्या. प्रत्येक महिन्याला साधारणपणे या कंपन्या 28 लाख कार विकत होत्या. म्हणजे या कंपन्यांवर किती परिणाम झाला आहे याचा अंदाज येऊ शकतो. ज्या चीनमध्ये करोनाव्हायरस सुरू झाला आहे त्या चीनमध्ये एप्रिल महिन्यामध्ये 2 लाख 24 हजार विकल्या गेल्या आहेत.
यावरून आपले लॉक डाऊन किती कडक आहे याचा अंदाज येऊ शकतो असे त्यांनी सांगितले. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने शक्य तितक्या लवकर या उद्योगाचे काम सुरू करण्यास आवश्यक त्या परवानग्या देण्याची गरज आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. एप्रिल महिन्यामध्ये देशांतर्गत कार विक्री शून्यावर गेली असली तरी या महिन्यांमध्ये मारुती सुझुकीने 632 कार निर्यात केल्या आहेत. महिंद्रा कंपनीने 733 तर ह्युंदाई कंपनीने 1,341 कार निर्यात केल्या आहेत.
रोज 2,300 कोटींचे नुकसान
वाहन उद्योग गेल्या 2 महिन्यापासून ठटप्प आहे. निर्मितीबरोबर विक्री थांबलेली आहे. त्यामुळे या उद्योगाचे रोज 2,300 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सिआमने म्हटले आहे. दरम्यानच्या काळामध्ये बीएस-6 उत्सर्जन मानदंडाची वाहने कंपन्यांना विकणे बंधनकारक करण्यात आले आहे. या वाहनांचे दर पूर्वीच्या वाहनापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांना जिवाचे रान करावे लागणार असल्याचे सिआमने यांनी म्हटले आहे.