अकोला (दीपक गवई)- रासायनिक खतांची विक्री करताना ती पॉस मशीनद्वारेच करावी, कोणत्याही विक्रेत्याने पॉस मशीनऐवजी आॅफलाइन विक्री केल्यास त्याचा परवाना रद्दचा प्रस्ताव सादर करा, असे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत सोमवारी कृषी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह बियाणे, खते, कीटकनाशक उत्पादक, वितरक, कृषी सेवा केंद्र संचालक, रेल्वे, उपप्रादेशिक अधिकारी कार्यालय, माथाडी कामगारांसह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी बियाणे व खत पुरवठ्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. सोबतच चालू वर्षात कापूस, सोयाबीनचे क्षेत्र कमी करून अन्नधान्याचे क्षेत्र वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात खरिपासाठी लागणाºया खतांचा पुरवठा संबंधित कंपन्यांनी करावा, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच कंपन्यांनी शेतकºयांची गर्दी कमी करण्यासाठी डिलरची संख्या वाढविण्याचे सांगितले जाणार आहे.
खतांची विक्री करताना लिंकिंग करू नये, तसेच पॉस मशीनऐवजी आॅफलाइन खतांची विक्री केल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव कृषी विकास अधिकाºयांनी सादर करावा, त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही वाघ यांनी यावेळी सांगितले. यावर्षी विस्तार कार्यासाठी निधी मिळणार नसल्याने कंपन्यांनी सीएसआर निधीतून प्रात्यक्षिके घ्यावी, शेतकºयांना माहिती द्यावी, प्रशिक्षण द्यावे, असेही बैठकीत सांगण्यात आले. कापूस बियाण्यांचे वाटप १५ मेपासून करण्याचेही निर्देश देण्यात आले. कृषी साहित्य गावापर्यंत पोहचवून देण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. सोयाबीन बियाण्याची टंचाई भासू नये, यासाठी ग्रामबीजोत्पादनांतर्गत बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, गुणनियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे, सर्व तालुकास्तरीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे संजय गवई, संजय गवळी, पंकज जगताप यांच्यासह संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.