अकोला- कोरोना विषाणू बाधीत रुग्णांच्या पॉझिटीव्ह संख्येत एकदम सात ने वाढ झाली त्यामुळे आता ही संख्या नऊ वर पोहोचली आहे. हे सातही रुग्ण पातूर येथील असल्याने बाळापुर उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांनी पातूरचा नियंत्रण आराखडा जाहीर केला आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांनी निर्धारीत केलेल्या या आराखड्यानुसार बाधीत व्यक्तीच्या समुदायाच्या निवासापासून तीन किमी परिसरापर्यंत नागरिकांच्या हालचाल, संपर्कावर निर्बंध आणले जातात. त्यासाठी या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
त्यात काशीद पुरा, मोमीन पुरा, गुलशन कॉलनी, देशमुख नगर, गुजरी बाजार, शहाबाबु चॅवक, चिरा चौक, देवडी मैदान, आठवडी बाजार, गुरुवार पेठ, काजीपुरा पेठ, बाळापूर वेस, सिदाजी वेटाळ, पोलीस स्टेशन ते बाळापूर रोड पर्यंत, शिक्षक कॉलनी, एपीएमसी एरीया, अकबर प्लॉट, कढोणे नगर, रविंद्र नगर, उमाळे नगर, समी प्लॉट यांचा समावेश आहे. तर प्रथम नियंत्रण रेषा ही मुजावर पुरा, मोमीनपुरा, काशीदपुरा, बादशहा नगर, गुलशन कॉलनी याठिकाणी असेल.
तर शहरात एकूण १५ कायमस्वरुपी तर सहा तात्पुरत्या बॅरिकेट्स लावल्या जातील. सहा तात्पुरत्या बॅरिकेट्स मधून अत्यावश्यक सेवांशी निगडीत दवाखाने, मेडीकल या कामांसाठी जाण्याची परवानगी असेल तसेच जीवनावश्यक वस्तूंचे ठोक व किरकोळ व्यापारी यांना मर्यादित प्रमाणात प्रवेश असेल. त्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्यास वा बाहेरच्या व्यक्तीला आत येण्यास परवानगी नसेल. यानुसार पातुर शहराच्या सीमाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पातूर शहरात सकाळी व सायंकाळी फिरणाऱ्या व्यक्तींनाही बंदी घालण्यात आली आहे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.