हिवरखेड (धिरज बजाज): हिवरखेड अकोट राज्यमहामार्ग क्र. 47 मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याचे तथाकथित जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानाने काम सुरू झाल्यापासून आजपावतो या मृत्यू मार्गावर शेकडो अपघात घडले असून विविध घटनांमध्ये अनेक वाहनधारक मृत्युमुखी पडले आहेत. अपघातांमध्ये ज्यांचे अकाली जीव गेले त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती आहे. या रस्त्यावरील अपघातांमध्ये आणखी भर पडली असून दिनांक 2 डिसेंबर सोमवार रोजी संध्याकाळी हिवरखेड नजीक सरकार ढाबा जवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर अपघात झाला. एका मोटरसायकलवर मुंडगाव येथील शेषराव सीताराम फडके वय 61 आणि शेर खान गफूर खान पठाण वय 55 वर्ष राहणार चोहोट्टा बाजार हे दोघे दुचाकीने जात होते. तर दुसरीकडून उत्तमराव ठाकरे वय 57 राहणार कार्ला बु. हे दुचाकीने येत होते. धनी दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यापैकी उत्तमराव ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले.
108 कधीपर्यंत नादुरुस्त राहणार
सदर जखमींना अकोला नेण्यासाठी रुग्णवाहिका शोधली असता 102 रुग्णवाहिका आधीच गेलेली होती. तर 108 रुग्णवाहिका अनेक दिवसांपासून नादुरुस्त स्थितीत असून परिसरातील बहुतांश 108 रुग्णवाहिका आजारी असून त्यामुळे नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घेऊन रुग्णांना अकोला येथे हलवावे लागत आहे. त्यामुळे अनेक जखमींचा जीव धोक्यात येण्याच्या घटना घडल्या आहेत आणि गरिबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे 108 रुग्णवाहिका कडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील की नाही असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.