हिवरखेड (धीरज बजाज)- महाराष्ट्र-मध्यप्रदेश ला जोडणारा आकोट हिवरखेड आमलाखुर्द या रेल्वेमार्गाचे काम सुरु होण्यासाठी आणि या मार्गाचे महत्व आणि गांभीर्य शासनाच्या लक्षात यावे म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने या हिवरखेड रेल्वे स्टेशनचा प्रतिकात्मक वाढदिवस साजरा केला.
सविस्तर असे की अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या अकोला खंडवा इंदोर या रेल्वे मार्गातील अकोला ते अकोट या सेक्शनचे काम पूर्णत्वास गेले असून अकोला अकोट मार्गावर पहिले इंजिन ट्रायल झाल्यामुळे प्रवाशांमध्ये अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. परंतु या मार्गावरील दुसरा टप्पा म्हणजेच अकोट- आमला खुर्द या मार्गाचे काम सुरू न झाल्यामुळे हा मार्ग उपेक्षितच राहिल का असा सवाल नागरिक करीत आहेत. आकोट-खंडवा हा उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असून अनेक वर्षांपासून बंद आहे. सदर रेल्वेमार्ग बंद झाल्यामुळे हजारो-लाखो प्रवाशांना नाहक मनस्ताप होत असून हजारो रुपये अतिरिक्त खर्च करून शेकडो किलोमीटर वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
हा रेल्वेमार्ग मेळघाटच्या आतून किंवा बाहेरून यापैकी कोठूनही झाला तरी चालेल. परंतु या रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू व्हावे. अशी सामान्य नागरिकांची भावना आहे. अकोट आमला खुर्द ह्या 77 किलोमीटरच्या मार्गांपैकी विवाद फक्त मेळघाट मधून जाणाऱ्या काही किलोमीटरचाच आहे. आणि हा मार्ग कोठूनही झाला तरी हिवरखेड मार्गेच जाईल हे निश्चित आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत अकोट आमलाखुर्द ह्या सेक्शनचे अकोट -हिवरखेड आणि हिवरखेड- आमला खुर्द अशा दोन भागात विभागणी करावी.
अकोट- हिवरखेड ह्या वीस किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी हिवरखेड विकास मंच आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली होती. त्यावर प्रधानमंत्री कार्यालयातून रेल्वे विभागाला पत्र देण्यात आले होते. परंतु रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणतीही सकारात्मक पावले उचलन्याचे संकेत अजूनही मिळाले नाहीत. आता अकोट-हिवरखेड पर्यंतचे काम सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजयजी धोत्रे आणि रेल्वे विभागाने सकारात्मक पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.