दिल्ली- दिल्लीतील एका 30 वर्षांच्या युवकाने आत्महत्या केली. या युवकाचे नाव ‘हरप्रीत सिंग’ असून तो एका खासगी कंपनीमध्ये काम करत होता. हरप्रीत हा गेले काही दिवस अपघातात जखमी झाल्यामुळे घरीच होता. 12 नोव्हेंबरच्या रात्री त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली असावी याचा शोध घेत असताना पोलिसांना धक्कादायक बाब समजली.
हरप्रीत सिंग हा त्याचे आई-वडील, बहीण व भाऊ जसप्रीत यांचासोबत निहाल विहार येथे राहत होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान हरप्रीतचा भाऊ जसप्रीतने सांगितले की, हरप्रीतचे त्याचा कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. काही दिवसांपूर्वी हरप्रीतच्या वडिलांनी मुलीच्या घरी लग्नाची हरप्रीतसोबत मुलीचे लग्न करून द्यावे अशी गळही घातली होती. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी नकार दिला होता.
हरप्रीतने आत्महत्या करण्याआधी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये प्रेयसीला त्याने 7 लाख रुपये दिल्याचं म्हटलं होतं. या पैशांची तो तरुणीकडे मागणी करत होता. या मागणीमुळे भडकलेल्या तरुणीने हरप्रीतला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. तिच्यासोबत तिचे दोन मित्रही आपल्याला त्रास देत होते असंही हरप्रीतने लिहिले आहे. या त्रासामुळे आणि प्रेयसीने दिलेल्या धमकीमुळे हरप्रीतला नैराश्याने घेरले होते. या नैराश्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले असा त्याच्या भावाने आरोप केला आहे.
‘अंत्यसंस्कारासाठी प्रेयसीला नक्की बोलवा’
हरप्रीतने फेसबुकवर त्याचा एका मित्राला लिहिले आहे की ” खूप प्रयत्न करूनही मी तिने मला दिलेला त्रास विसरु शकत नाही आहे.तिच्या मित्रांनी मला जबरदस्ती केली. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे … माझ्या मृत्यूची बातमी आणि फेसबुकवरील माझा शेवटचा फोटो अपडेट करा. मुलीने नंबर बदलला आहे. तिच्या आईचा नंबर माझ्या फोनमध्ये आहे. तिला माझ्या अंत्यसंस्काराला येण्यास नक्की सांगा” असंही हरप्रीतने लिहून ठेवलं आहे. हरप्रीतच्या आत्महत्यानंतर पोलिसांनी त्याच्या प्रेयसीविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.