अकोला, दि.14 (जिमाका)- महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे संचालित ‘चाईल्ड लाईन 1098’ या प्रकल्पांतर्गत बालदिनानिमित्त आजपासून ते दि.20 दरम्यान बाल हक्क आणि सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त करावयाच्या प्रचाराच्या रथाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘बालकांप्रती माझी काय जबाबदारी’ याबाबतचा प्रचार या रथाद्वारे सप्ताहभर केला जाणार आहे. या सप्ताहात तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आरोग्य तपासणीसह विविध विषयावरील मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवार दि.15 रोजी सावित्रीबाई फुले विद्यालय कृषी नगर अकोला येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर, शनिवार दि.16 रोजी महात्मा फुले नर्सिंग महाविद्यालयामध्ये ‘बाल सुरक्षा आणि पास्को कायद्या’विषयी मार्गदर्शन शिबीर, रविवार दि. 17 रोजी सम्यक संबोधी सभागृहात सकाळी दहा वाजता ‘बालस्नेही समाज’, या विषयावर चर्चासत्र, सोमवार दि.18 रोजी न्यू खेतान नगर कौलखेड मधील अमृतकलश विद्यालयात ‘बाल सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम’ या विषयावर मार्गदर्शन, मंगळवार दि.19 रोजी दुपारी दोन वाजता अंगणवाडी आणि आशासेविका यांना ‘बाल सुरक्षा आणि आहार’ याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बुधवार दि.20 रोजी रामदासपेठ येथील सन्मित्र पब्लिक स्कूल मध्ये शालेय विद्यार्थ्यांकरिता बाल सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम याविषयी मार्गदर्शन होणार आहे.
महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे संचालित चाईल्ड लाईन 1098 या प्रकल्पांतर्गत आठवडाभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष सुगत वाघमारे यांनी दिली.