(श्याम बहुरुपे) बाळापूर: दि.४ येथील तहसिल कार्यालयात कृषी, महसूल व पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करून पंचनामे करण्याचे निर्देश आमदारांनी बाळापूर उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पातूर व बाळापूर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतशिवाराला नवनिर्वाचित आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये व नुकसानीचा शंभर टक्के सर्व्हे व्हावा यासाठी सोमवारी दुपारी संयुक्तरीत्या बैठक बोलावली होती.
ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला असेल त्याचा पंचनामा व अर्ज स्विकारण्याची जबाबदारी या बैठकीत अधीकाऱ्यांना देण्यात आली.
तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कृषी विभाग, तालुका प्रशासनास सहा नोव्हेंबर पर्यंत नुकसानीचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करावा, असेही आमदार देशमुख म्हणाले. जो पर्यंत पिकांचे पंचनामे पुर्ण होत नाहीत तोपर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालय सोडू नये व पिकविम्याचा एकही शेतकरी सुटला तर याची संपूर्ण जबाबदारी यंत्रणेवर राहील. बैठकीला उपविभागीय अधिकारी रमेश पवार, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कृषी अधिकारी नंदकुमार माने, गटविकास अधिकारी समाधान वाघ उपस्थित होते.