अकोला(प्रतिनिधी)- गत काही दिवसांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या बाबासाहेब धाबेकर यांनी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता अखेरचा ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
बाबासाहेब धाबेकर हे बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गावचे रहिवासी होते. धाबा ग्रामपंचायत सदस्य पदापासून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरु केली. उपसरपंच, सरपंच, बार्शीटाकळी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जि.प. सभापती नंतर अध्यक्ष असा प्रवास करीत त्यांनी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली आणि त्यात ते विजयीसुद्धा झाले.
आमदार झाल्यानंतर शिवसेना-भाजप
युतीला पाठिंबा दिला याच सरकारमध्ये त्यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागली. जलसंधारण खातं त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना गती दिली. यासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले. यासोबत त्यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकही लढविली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना धाबेकरांनी विकासकामांचा धडका लावत अकोला जिल्हा परिषदेला राज्यात वेगळी ओळख निर्माण करून दिली. सुतगिरणी, साखर कारखान्याची उभारणीही त्यांनी केली. त्यांच्या कार्यकाळात स्थापन झालेला साखर कारखाना त्यांनी हयात असेपर्यंत नफ्यात ठेवला. रोखठोक भूमिका घेणारे नेते व विकास महर्षी म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे व मैत्रिपूर्ण संबंध होते.