हिवरखेड(धीरज बजाज):- अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे आज हिंगणी येथे एका कार्यक्रमाकरिता गेले असता यावेळी हिंगणी, दानापुर, बेलखेड, गोर्धा, कोठा, चांगलवाडी, वाडी उकडी, इत्यादी अनेक गावांचे शेतकरी हजर होते. संतप्त शेतकर्यांनी वान चे पाणी अकोला पळविण्याचा मुद्द्यावर त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अनेक भाजपा कार्यकर्ते आणि समर्थक हजर होते. त्यांनी सुद्धा या मुद्यावर आमदारांकडे जाहीर नाराजी व्यक्त केली. संतप्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर यावेळी भारसाकळे देऊ शकले नाहीत अशी चर्चा आहे. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांनी आमदार भारसाकळे चले जाव चले जाव चे नारे लावून आपल्या भावना व्यक्त केल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळे आमदारांनी तेथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आमदार भारसाकळे मार्फत हिवरखेड पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही वेळातच हिवरखेड पोलिसांची गाडी पोहोचली अशी माहिती सूत्रांनी दिली. सदर घटनेबाबत हिवरखेड ठाणेदार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. आपल्याच मतदारांमध्ये आमदारांना मंजूर अंगरक्षका नंतरही पोलिसांना बोलावे लागत असेल तर मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल किती प्रचंड प्रमाणात नाराजी आहे ह्याची प्रचिती येते.