अकोट (सारंग कराळे)- अकोट ग्रामीण रुग्णालयात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दीलेल्या भेटीत रुग्णालयातील अनेक गंभीर बाबी समोर आल्या. सहा डॉक्टर व एकूण ३९ कर्मचारी ताफा असलेल्या रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. केवळ हे रुग्णालय केवळ रेफर केंद्र बनवले का? अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी कर्मचाऱ्यांना फटकारले. गैरहजर वैद्यकीय अधिकारी,औषधीचा तुटवडा, पदवीधर कंत्राटी व्यक्तीच्या भरवशावर शुक्रवारी सर्व वैद्यकीय सेवा असा वैद्यकीय कारभार पाहता रुग्णालयाचे कारभाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे डॉ पाटील म्हणाले.
सर्पदंशाने मृत्यू झालेले भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे यांच्या अकोलखेड निवासस्थानी डॉ. पाटील भेट देण्यासाठी आले होते. त्यानी अकोट रुग्णालयाचे अचानक भेट देत ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारीसह डॉक्टर उपस्थित नव्हते. तर केवळ कंत्राटी कर्मचारी हजर होते. रुग्णालयात रूग्णांना प्राथमिक उपचार पदवीधर असलेला पवार नामक व्यक्ती देत असल्याचे निदर्शनात आले. रुग्णालयात डॉक्टर व अधिकारी यांच्या खुर्च्या खाली आढळल्या. पालकमंत्री रुग्णालयात आले असल्याची माहिती मिळताच हजेरी पत्रकावर सह्या मारलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्यांचे सहकाऱ्यांनी फोन लावून बोलावुन घेतले. यावेळी रुग्णालव वार्डाची साफसफाई पाहणी करण्यात आली तसेच भरती असलेल्या रुग्णांची विचारपुस डॉ. पाटील यांनी केली. त्यानंतर उपस्थित झालेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कामाची पध्दत विचारत धारेवर धरले.
उपस्थिती बाबत हजेरीपत्रक तपासले या पत्रकावर अनेकांनी सह्या केल्या परंतु प्रत्यक्षात गैरहजर आढळले. तर वैद्यकीय अधीक्षक यांची ड्युटी असताना दोन दिवसांपासून गैरहजर असल्याचे आढळले. ग्रामीण रुग्णालयात सहा डॉक्टर सह ३९ कर्मचारी असल्याची माहिती डॉ. पाटील यांना देण्यात आली. परंतु प्रत्यक्षात अनेकजण कामानिमित्त रुग्णालयाचे बाहेर सांगण्यात आले. यावेळी एक्स-रे मशीन व विविध विभागात वेळेवर तज्ञ गैरहजर होते., रुग्णांना उपचारासाठी आणले असता डॉक्टरांना फोन लावून बोलावण्यात येते. जखमींवर थातूरमातूर उपचार, पुरेशी औषध दिले जात नाही. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाही, रुग्णांना ताटकळत ठेवल्या जाते, त्यामुळे नाईलाजाने गोरगरिबांना खासगी रुग्णालयात जाऊन महागडे उपचार घ्यावे लागतात. रात्रीच्या वेळी रुग्णालय वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, विशेष म्हणजे एखादा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही तो जिवंत असल्याचे सांगून अकोला रेफर केले जात असल्याचे अनेक प्रकार घडले, आदी विविध समस्यांचा पाढा यावेळी नागरिकांनी पालकमंत्री पाटील यांच्यासमोर मांडला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, अरुण जंवजाळ, डॉ. गजानन महल्ले, डॉ. अरविंद लांडे, चंदू दुबे,राम मंगळे, डॉ. लोखंडे, योगेश नाठे, पत्रकार विजय शिंदे, सारंग कराळे,राजू शेळके, मनोज चंदन,विवेक धुळे.ग्रामीण चे ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक रुपनर यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप-सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
आमदार भारसाकळे उद्घाटन सोहळ्यात.. भाजपा शोकमग्न
अकोट मतदारसंघातील भाजपा परिवार शोक मग्न असताना शुक्रवारी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तेल्हारा तालुक्यात विकास कामाचे उद्घाटन सोहळे घेतले तर दुसरीकडे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्व. भांडे यांच्या मृत्यू व उपचाराबाबत माहिती घेत अकोट ग्रामीण रुग्णालय गाठून अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुग्णांना वेळेवर मिळत नसल्याने उपचाराबाबत धारेवर धरले. भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे यांच्या मृत्यूनंतर ग्रामीण रुग्णालयाचा कारभाराची साधी चौकशी व कारवाई ची करण्याची तसदी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी घेतलीच नाही, उलट शोककळा पसरली असताना विकास कामाचे उद्घाटन सोहळे येत असल्याने भाजप कार्यकर्त्याची प्रचंड नाराजी पसरली आहे