*महत्वाच्या पुलांच्या कामाअभावी रहदारी बाधित*
हिवरखेड(दीपक रेळे)- हिवरखेड मध्ये उशिरा का होईना मान्सूनचे लेट पण थेट आगमन झाले आहे. हिवरखेड परिसरात जवळपास तासभर मान्सूनचा पहिला पाऊस धो-धो बरसला. प्रचंड मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह, पावसाने दमदार स्वरूपात पहिली हजेरी लावली.
मान्सूनच्या आगमनाने पहिल्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे…
एकीकडे शेतकरी वर्गात पावसामुळे समाधान व्यक्त केल्या जात असले तरी विविध कारणांनी लेंडी नाला मात्र नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. लेंडी नाला हिवरखेड मधून वाहत असून त्यावर एकूण चार मुख्य पूल होते. त्यापैकी राज्यमार्गावरील पूल आणि गोर्धा वेस वरील पुल सुस्थितीत आहेत. परंतु दत्त भारती मंदिर जवळील पूल मागच्या वर्षी ट्रक सह नाल्यात कोसळल्यामुळे नंतर फक्त पादचाऱ्यांसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. तसेच फत्तेपुरी जवळील पूल जीर्ण व जुना असून तो पूर्णतः नाल्यात दबल्यामुळे व ऊंची नसल्याने नसल्याने उन्हाळ्यातील सांडपाणी सुद्धा अनेकदा पुलावरूनच वाहत असते. त्याचप्रमाणे आठवडी बाजार ते पाण्याच्या टाकी दरम्यान मोठ्या पुलाची तर देवळी वेस जवळ छोट्या पुलाची असे एकूण चार पुलांची निर्मिती अत्यावश्यक आहे.
मान्सून पूर्व स्वच्छतेच्या नावाखाली लेंडी नाल्याची दरवर्षी फक्त थातूरमातूर सफाई करण्यात येते पण यावर्षी मान्सून उशीरा येऊनही पोकलेन मशीन न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोडून थातूरमातूर स्वच्छता सुद्धा होऊ शकली नाही. त्यामुळे लेंडी नाल्याला झाडाझुडपांनी व कचऱ्याने ब्लॉक केल्यामुळे नाल्याकाठच्या रहिवाशांच्या घरात टोंगळाभर पाणी शिरल्यामुळे त्यांचे बरेचशे नुकसान झाले. आणि या चार अत्यावश्यक पुलांअभावी नागरिकांना रहदारी साठी मोठी अडचण निर्माण झाली. एवढ्या पुलांचे बांधकाम ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून करणे शक्य नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे संबंधितांनी पाठपुरावा केल्यानंतरही कोणीही निधी देण्यात रस दाखविला नाही. असे काही ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. तरीही सामान्य फंडातून फत्तेपुरी जवळील पुलाचे काम सुरु करण्याचा प्रयत्न करू असे सरपंचांनी सांगितले. पावसामुळे नागरिकांच्या समस्या बद्दल सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्यांनी नागरिकांची भेट घेऊन विचारपूस केली