हिवरखेड (दिपक रेळे)- एसटी महामंडळात अकोट डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी सौ शीला सफल वाकोडे ह्या हीवरखेड येथील महिलेचा वेळेवर उपचारा अभावी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे बाळही पोटातच दगावले आहे.
सौ शीला सफल वाकोडे ह्या गरोदर असल्याने 14 जून रोजी पहाटे त्यांचे पोट जोराने दुखू लागल्याने त्यांना वेदना असह्य झाल्या. तसेच त्यांना बीपीचा सुद्धा त्रास होता. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने जवळच असलेल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले परंतु तेथे ड्युटी असलेले डॉक्टर उपस्थित नव्हते. तसेच महिलेची प्रकृती बिघडत असल्याने उपस्थित परिचारिकेने त्यांना रेफर शीट देऊन अकोट येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे 108 रुग्णवाहिकेची विचारणा करण्यात आली. परंतु 108 रुग्णवाहिका पंचर असल्याने व सोबत स्टेपनी नसल्याने दुसऱ्या गावाची 108 रुग्णवाहिका बोलवावी लागेल व त्यासाठी दीड-दोन तास लागतील असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी नाईलाजास्तव खाजगी वाहनातच महिलेला तात्काळ अकोट येथे नेण्याचा निर्णय घेतला. परंतु डॉक्टर आणि रुग्ण वाहिकेअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने रस्त्यातच या महिलेचा पोटातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाला. अकोट येथे पोहोचताच तेथील डॉक्टरांनी सदर महिलेला मृत घोषित केले. हिवरखेड हे खूप मोठे गाव असून हिवरखेड सह आजूबाजूच्या परिसरातील जवळपास एक लाख लोकांच्या आरोग्याचा भार एकच 108 रुग्णवाहिकेवर असल्याने सोबतच हिवरखेड येथे कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती नसल्याने, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने, आणि कधीकधी आवश्यक औषध साठा उपलब्ध नसल्याने, आणि इतर मूलभूत सुविधांच्या अभावी मागील अनुभव पाहता येथे बऱ्याचदा तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु तरीही येथील नागरिकांच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शासनाने वेळीच योग्य पावले उचलण्याची नितांत आवश्यकता या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
प्रतिक्रिया
हिवरखेड येथे डॉक्टरही हजर नव्हते तसेच 108 रुग्णवाहिका हि पंक्चर होती त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने मातेसहित पोटातील बाळ हि दगावले…
रविंद्र वाकोडे, मृतक महिलेचे नातेवाईक
त्यावेळी डॉक्टर निलेश देवर यांची ड्युटी होती पण तरीही ते ड्युटीवर हजर नव्हते. 108 अतिरिक्त रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असल्याने वरिष्ठांकडे मागणी केली आहे.
डॉ. नंदकिशोर चव्हाण, वैद्यकीय अधिकारी हिवरखेड.
माझी हिवरखेड ला बदली नसून प्रतिनियुक्तीवर आहे त्यामुळे मी संध्याकाळीच परत जातो.
डॉ निलेश देवर, डॉक्टर
हिवरखेड येथील मोठी रुग्णसंख्या पाहता अतिरिक्त 108 रुग्णवाहिका आवश्यक आहे. परंतु शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच हिवरखेड येथे अतिरीक्त 108 रुग्णवाहिका सुरू करता येईल.
नितेश थोरात सुपरवायजर 108 अकोला विभाग.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola