हिवरखेड (दिपक रेळे)– काही चांगले अपवाद वगळता शासकीय कामे किती निकृष्ट दर्जाची असतात याचे पावलोपावली अनुभव हिवरखेड वासियांना येत आहेत. निकृष्ट बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येण्याच्या लग्ना हिवरखेड मध्ये वाढीस लागल्या आहेत.
हिवरखेड ते काही वर्षांआधीच फत्तेपुरी संस्थान जवळ पंचायत समिती अंतर्गत सार्वजनिक महिला शौचालयांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यातल्या त्यात सन 2016 मध्येच जवळपास पावणे दोन लक्ष रूपये ह्या शौचालयांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आले होते हे उल्लेखनीय.
दि 5 जून रोजी दुपारी आशाबाई विठ्ठल डिगे ह्या वृद्ध महिला शौचालयात गेल्या असता त्या शौचालयाच्या शीट आणि टाइल्स सगट शौचालयाचा मैला साचणाऱ्या घाणटाक्यात कोसळल्या. मानेच्या वरचा भाग वगळता त्या पूर्णपणे घाणीत बुडाल्यामुळे प्रचंड घाबरल्या. सदर शौचालयांमध्ये नेहमी प्रचंड घाण, दुर्गंधी, अस्वच्छता राहत असल्याने आशाबाईंनी शौचालयात जाण्याआधी तोंडाला लुगडे बांधले होते त्यामुळे घाणटाक्यात बुडाल्यानंतर त्यांना मोठ्याने ओरडणे ही शक्य झाले नाही. दुपारची वेळ असल्याने उन्हामुळे कोणीही हजर नव्हते. परंतु सुदैवाने तेथून जाणाऱ्या विठ्ठल रामकृष्ण अढाऊ या युवकाला ही बाब लक्षात आल्याने त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आशाबाईंना घाण टाक्याच्या बाहेर काढले. त्यामुळे आशाबाई यांचे प्राण वाचले. पण त्यांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या आणि कमरेला मोठ्या प्रमाणात मुका मार लागला. त्यातच त्यांचे कष्टाचे चारशे रुपये पडले आणि कपडेही निकामी झाले. ही वार्ता गावात वार्यासारखी पसरली आणि अनेक लोकं तेथे हजर झाले परंतु आशाबाईंना दवाखान्यात उपचारासाठी देण्याचे सौजन्य कोणी दाखविले नाही.
हि पहिलीच घटना नसून ह्याच शौचालयामधील दुसरे युनिटमध्ये मागच्या वर्षी अशाच प्रकारे बेबीबाई बाळू पातोळे हि महिला संडासच्या शीटसह घाण टाक्यात अशाच प्रकारे कोसळली होती. त्यावेळी अनेक महिलांनी मिळून त्यांना वाचविले. त्या महिलेच्या मोडलेल्या हाताचा त्रास अजूनही कायम आहे. त्यावेळी अनेक ग्रा प सदस्यांनी ह्या शौचालयाच्या चौकशीबाबत जिल्हाधिकारी यांचेसह अनेक वरिष्ठांना निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. पण नंतर काहीही नाही. वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई केली असती तर ह्या संतापजनक घटनेची पुनरावृत्ती झाली नसती. दोन वेळा संडास शीटसह महिला बुडण्याच्या घटनेला कोण जबाबदार आहेत की ती महिला शौचालयात जाऊन पडल्याने ती स्वतःच जबाबदार आहे काय??? असा संतप्त सवाल जनता करीत आहे.
प्रतिक्रिया
आमच्या कार्यकाळात शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले होते ते काम पूर्ण नियमानुसार झाले असेल ह्याची संपूर्ण चौकशी करूनच इंजिनीयर ने एम.बी.सी.सी. केली असेल त्यानंतरच बिल काढण्यात आले.
सौ. प्रतिभाताई विरेंद्र येऊल तत्कालीन सरपंच हिवरखेड.
आम्ही शौचालय दुरुस्तीच्या चौकशीबाबत वरिष्ठांना अनेक निवेदने दिली. परंतु काहीही कारवाई झाली नाही त्यामुळे दोषींवर कार्यवाही व्हावी.
रविंद्र वाकोडे ग्रा प सदस्य वॉर्ड क्र 2 हिवरखेड.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola