हिवरखेड(दिपक रेळे)- वर्षानुवर्षांपासून खराब रस्त्यांमुळे मेटाकुटीस आल्यानंतरही हिवरखेड आणि परिसरातील जनता आपल्या प्रचंड सहनशीलतेचा परिचय देत होती. परंतु आता नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला असून हिवरखेड पासून राज्यमार्गांच्या तात्काळ दर्जेदार काम सुरु करण्यासाठी सर्वसामान्य हिवरखेड वासी एकवटले असून त्यांना हिवरखेड, चितलवाडी, खंडाळा, कार्ला, सौन्दळा, गोर्धा, झरी बाजार, इत्यादी अनेक ग्रामपंचायतींचा लेखी आणि सक्रिय सहभागाचा पाठिंबा मिळाला आहे. सदर हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्त दिलेल्या सह्यांचे निवेदन आणि विविध ग्रामपंचायतीचे पत्र रस्ताग्रस्त संघर्ष समिती हिवरखेड द्वारे दिनांक 10 मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पालकमंत्री कार्यालय, सामाजिक बांधकाम विभाग अकोला, सामाजिक बांधकाम उपविभाग तेल्हारा, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, हिवरखेड ठाणेदार, यासह अनेक संबंधितांना देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये हिवरखेड वासीयांनी रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल होत असलेल्या प्रचंड समस्यांचा पाढा शासनासमोर वाचला आहे. आणि निवेदन दिल्यापासून सात दिवसाच्या आत हिवरखेड पासून दर्जेदार रस्त्यांच्या कामाला सुरुवात न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता “न भूतो, न भविष्यती” अशा प्रकारचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. रस्ता ग्रस्त संघर्ष समितीचे सदस्य जिल्हाधिकार्यांना भेटले आणि भीषण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सदर रस्त्यांच्या दूरदर्शनमुळे अपघात घडल्यास व कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी संबंधित कंत्राटदार आणि सामाजिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारीच सर्वस्वी जबाबदार राहतील अशी सक्त ताकीद सामाजिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे दिली आहे.
परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला या आंदोलनाचे कोणतेही गांभीर्य सद्यस्थितीत दिसत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यावरसुद्धा सामाजिक बांधकाम विभागाच्या तेल्हारा, आणि अकोला कार्यालयात कोणतेही संबंधित जबाबदार अधिकारी नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी व चर्चेसाठी हजर नव्हते हे विशेष..
प्रतिक्रिया
जनतेच्या संयमाचा बांध तुटला असून आता कोरड्या आश्वासनांवर विश्वास केला जाणार नाही. तात्काळ रस्त्यांचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईलच
रस्ता ग्रस्त संघर्ष समिती हिवरखेड.