अकोला(प्रतिनिधी)- अकोला लोकसभा मतदारसंघात प्रचार कार्यकाळात प्रचार थंडावलेला दिसून येत असून जिल्ह्यात रणधुमाळी नसल्याचे चित्र नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाकरिता अवघे आठ दिवस बाकी आहेत. पुढचे सहा दिवस हे प्रचाराचे दिवस आहेत; मात्र अजूनही अकोला लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी दिसत नाही. २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी विविध साधनांचा वापर करून प्रचाराची रणधुमाळी उडविली होती.
कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली की त्याच दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होत असे. त्यासाठी सर्वात आधी खासगी वाहनांची बुकिंग केली जाई व गावा-गावांतून गाड्यांवर ध्वनिक्षेपक लावून प्रचार करण्यापासून तर गल्लोगल्ली मोठमोठे फलक लावण्याचे काम सर्वात आधी केले जाई. त्यानंतर प्रचार दौरे, पदयात्रा, झालाच तर रोड शो, मोठ्या नेत्यांच्या सभा व नियोजन असा निवडणुकीचा माहोल आणखी रंगतदार करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गळ्यात दुपट्टे, टोप्या, पक्षाचे बिल्ले व त्यांच्या गाड्यांवर झेंडे अशा साधनांची आवश्यकता भासत असे. ही सर्व साधने स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करण्यावर उमेदवारांचा भर राहत असल्याने स्थानिक बाजारात अनेकांना रोजगार उपलब्ध होत असे. निवडणुकीच्या निमित्ताने बाजारात एकप्रकारे ‘इलेक्शन तेजी’ येत असे. यावेळी मात्र अशा प्रकारची कोणतीही तेजी नाही. निवडणुकीसाठी लागणाऱ्या साधनांच्या खरेदीमध्ये तब्बल ७० टक्के घट झाल्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त रोजगार मिळालाच नाही.
११२ वाहनांवर सुरू आहे प्रचार
प्रचारासाठी गावोगावी फिरणाऱ्या वाहनांची संख्या एकदमच रोडावली आहे. तब्बल ११ उमेदवार रिंगणात असतानाही निवडणूक विभागाकडून घेण्यात आलेल्या परवानगीनुसार केवळ ११२ वाहनांमधून निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. उमेदवारांच्या समर्थकांच्या गाड्यांचाही धुराळा ग्रामीण भागासह शहरातही दिसत नाही.
उमेदवारांनी आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी होर्डिंगवरचा खर्चही कमी केल्याचे दिसत आहे. संपूर्ण मतदारसंघात निवडणूक विभागाकडून अवघ्या ११३ होर्डिंगसाठी परवानगी घेण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च तुरळक
कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली की कार्यकर्ते अधिक जोमाने प्रचाराला लागतात. त्यामुळे नेते व पदाधिकारी निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांच्या भोजनावळीवर लक्ष देतात. यावेळी मात्र प्रचार संपायला सहा दिवस राहिले असतानाही अशा भोजनावळी तुरळकच दिसत आहेत. कदाचित शेवटच्या दिवसात भोजन खर्च वाढण्याची चिन्हे असली तरी सध्या हा खर्च अतिशय तुरळकच आहे.
गेल्या निवडणुकीची तुलना केली तर होर्डिंग छपाईचे काम ७० टक्के कमी आहे. उमेदवारांनी यावर्षी होर्डिंग छपाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी थेट त्यांच्या मुख्यालयातूनच फ्लॅक्स पाठविले आहेत.
यावर्षी बोटावर मोजता येतील एवढीच वाहने भाड्याने गेली आहेत. अकोल्यातील शेकडो गाड्यांना निवडणुकीच्या प्रचाराचे काम मिळाले नाही.
अधिक वाचा: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात 7 जागांवर मतदान, ईव्हीएममध्ये बिघाडाच्या 39 तक्रारी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola