पातूर(सुनील गाडगे)- तालुक्यातील बाभुळगाव येथील एका दैनिकाचा पत्रकार असणाऱ्या प्रवीण दांडगे यांना पातूरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी मंगळवारी पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्या पत्नीसमोर अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार घडला. यासंदर्भात प्रवीण दांडगे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करुन ठाणेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
पत्रकार दांडगे यांच्या पत्नीचा गावातीलच आनंद तेजराव धाडसे याच्यासोबत वाद झाला होता. धाडसे याने सदर महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला सोबतच महिलेचा मुलगा आणि दीर यांनाही लोटपाट आणि मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. यासंदर्भात दांडगे यांनी पत्नीसोबत जाऊन धाडसेच्या विरोधात पातूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सुरुवातीला त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करताना पोलिसांनी या दोन्ही पती -पत्नीला ठाण्यात तब्बल तीन तासपर्यंत ताटकळत ठेवले होते. यासंदर्भात मंगळवारच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या. त्यामध्ये पातूर पोलिसांच्या वर्तवणुकीवर ताशेरे ओढण्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर संतापलेल्या ठाणेदाराने मंगळवारी बीट जमादार श्रीकांत जायभाये यांना दांडगेच्या घरी पाठवून ठाण्यात बोलावून घेतले आणि त्याला मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही दिली. यावेळी विरोध करणाऱ्या दांडगे यांच्या पत्नीलाही ठाणेदाराने अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. त्यामुळे जातीद्वेष करणाऱ्या ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्यावर कठोर कारवाई करुन त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन दांडगे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना सादर केले आहे. पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या या ठाणेदाराचा पत्रकारांनी जाहीर निषेध केला आहे. या तक्रारीच्या प्रतिलिपी अनुसूचित जाती जमाती आयोग अध्यक्ष, मानवी हक्क आयोग अध्यक्ष, पोलिस महासंचालक, मुंबई आणि पोलिस महानिरीक्षक, अमरावती यांना पाठविण्यात आल्या आहेत.
———
अधिक वाचा : बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाकुचा धाक दाखवुन दुचाकीस्वारांना लुटले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola