अकोला (प्रतिनिधी) – शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज दिनांक 24 फेब्रूवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर , निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरूण वाघमारे, तहसिलदार विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासनासह कृषि विभाग व जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम 97.85 टक्के पुर्ण केले असुन लवकरच शेतक-यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात येणार आहे, असे सांगुन जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले की, शेतक-यांनी अभिनव पध्दतीचा वापर करून पाण्याचे योग्य नियोजन करून कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शेतक-यांच्या सन्मानासाठी हि योजना आहे. शेवटच्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी पोहचविण्यासाठी शासन कटिबध्द असुन शेतक-यांच्या खात्यात निधी पोहचविण्यासाठी काही त्रुटी किंवा अडचणी असल्यास लाभार्थ्यांनी ग्राम पातळीवर , तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करावी असे त्यांनी सांगितले.
1 लाख 13 हजार शेतकरी कुंटूबीयांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पोहचणार असल्याचे माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. सदर निधी लाभार्थ्यांनी आपल्या शेतीतील उत्पन्न वाढीसाठी तसेच अडिअडचणी साठी खर्च करून निधी सत्कार्मी लावावा असे त्यांनी सांगितले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातुन योजनेची माहिती सांगितली. सदर योजना राज्यात दिनांक 1 डिसेंबर 2018 पासुन राबविण्यात मान्यता प्रदान करण्यात आली असुन सदरील योजनेतंर्गत विहित निकषांप्रमाणे ज्या कुटंबाचे (पती , पत्नी व त्याची 18 वर्षाखालील अपत्ये) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक 2 हेक्टर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकरी कुंटबियास 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे दरवर्षी 3 हप्त्यात 6 हजार रूपयापर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता 31 मार्च पर्यंत शेतक-यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.
गावपातळीवर पात्र शेतक-यांच्या कुंटूबीयांचे निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यासाठी शेतक-यांचे नाव , लिंग , प्रवर्ग, आधारक्रमांक, बँकखाते क्रमांक , आयएफएससी कोड ,मो.क्रं , जन्मतारीख व पत्ता इत्यादी माहिती शेतक-यांनी दयावयाची आहे. तसेच सामाईक कुटूंबातील एक सदस्यांनी योजनेचा लाभ बँक खात्यावर अदा करण्यासाठी स्वयंम घोषणापत्र दयावयाचे आहे. लाभार्थ्यांची यादी अंतिम झाल्यावर केंद्र शासनाच्या पीएम किसान पोटर्लवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीव्दारे निधी जमा होणार आहे. या योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या असुन त्यानुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक नंदु वानखडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तहसिलदार विजय लोखंडे यांनी मानले. यावेळी या योजनेसाठी उत्कृष्ठ काम करणा-या नायब तहसिलदार शामला खोत, नायब तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर, ग्रामसेवक संगिता भगत, कृषि सहाय्यक आर.एम. वहितकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रधानमंत्री किसाना सन्मान निधी योजनेचा शुभारंभ गोरखपुर उत्तर प्रदेश येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले. तसेच मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक , प्रगतीशिल शेतकरी तसेच प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments 1