अकोला (प्रतिनिधी) – सासुरवाडीत आलेला जावई हायटेन्शन लाइनच्या (उच्च दाब वाहिनी)खांबावर आत्महत्या करण्यासाठी चढला. पत्नी व सासरचे विनवण्या करू लागले; मात्र तो खाली उतरेना. डाबकी रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय खंडारे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नशेत असल्याचे पाहून त्याला पोलिस म्हणाले,’ तुला काय पाहिजे सांग, दारूचा बॉक्स देतो, खायला मटण देतो, तुझ्या बायकोपोरांकडे पाह्य अन् खाली उतर.’ त्यावर तो म्हणाला, ‘मी खाली उतरलो तर तुम्ही मला मारहाण करणार.. घरी गेल्यावर तुम्ही रात्री घरी आले तर येणार नाही ना?’ पोलिस म्हणाले, ‘देवाशपथ सांगतो..तुला काहीच करणार नाही..’ त्यावर तो म्हणाला, ‘बायकोजवळ १०० रुपये द्या, तुमचा भरवसा नाही..तुम्ही दूर निघून जा. नंतर मी खाली उतरतो अन् निघून जातो.’ पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे १०० ऐवजी २०० रुपये दिले अन् पोलिस दूर गेल्यावर तो खाली उतरला अन् बायकोसह त्याच्या गावी निघून गेला. हा थरार रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बाखराबाद शिवारात घडला.
मद्यप्राशन केलेला ३० वर्षीय युवक संतोष पवार हा त्याची सासुरवाडी असलेल्या भौरद येथे शनिवारी आला होता. रविवारी सकाळीच मद्यप्राशन केल्यानंतर तो बाखराबाद शिवारात असलेल्या हायटेन्शन विजेच्या खांबावर जाऊन बसला. घटनेची माहिती गावात कळताच त्याची पत्नी वर्षांच्या मुलासह गावकऱ्यांसह पोहोचली. त्यानंतर पोलिसही पोहोचले. या वेळी पोलिसांनी त्याला खाली उतरण्याची विनंती केली असता तो खाली उतरायला तयार नव्हता. या वेळी पोलिसांना त्याची यशस्वीपणे समजूत काढण्यात यश आले. त्यानंतर पोलिस कारवाई न करण्याच्या अटीवर खाली उतरला व त्याच्या गावी निघून गेला.
गळ्यात वायर घेऊन चढला होता टॉवरवर
संतोष पवार हा टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळावर गेलो. त्याच्या गळ्यात एक वायर होते. त्याला विचारपूस केली असता तो दारू प्यायलेला होता. त्याची समजूत काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यात आम्हाला यश मिळाले. महत्प्रयासानंतर त्याने १०० रुपये मागितले. त्यावर त्याला २०० रुपये दिले. त्यानंतर त्याला खाली उतरवण्यात आम्हाला यश आले.
अधिक वाचा : दारू अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola