अकोला (प्रतिनिधी) : सुरक्षित वाहतुक आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राज्यात मोठया प्रमाणात सध्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, पाणंद रस्ते, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचा समावेश असून शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
हायब्रिड ॲन्युईटी अंतर्गत अकोला जिल्हयातील रुपये 755.32 कोटी रुपयांच्या पाच विविध रस्ते बांधकामाचे भूमिपूजन आज चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अकोल्यातील गोरेगाव टी पॉईंट, वाशिम रोड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वित्त व नियोजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्य मंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमाताई तायडे, आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, हरिष पिंपळे, रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत नवघरे, अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद व्यास आदींची उपस्थिती होती.
राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून रुपये एक लाख 6 हजार कोटी प्राप्त झाले, या निधीतून राष्ट्रीय महामार्गाची कामे मार्गी लागली, असे सांगून श्री. पाटील म्हणाले की, मागील चार वर्षात 22 हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे झाली आहेत. आता रस्त्यांच्या कामात शासनाचा 60 टक्के व उदयोजकांचा 40 टक्के सहभाग असणाऱ्या हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत मोठया प्रमाणात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. बहुतांश रस्ते पावसाळयाआधीच पूर्ण केली जाणार आहेत. ही रस्ते प्रशस्त आणि सिमेंट क्राँकीटची असणार आहेत. यामुळे रस्ते मजबुत असण्याबरोबरच ती दीर्घकाळ टिकणारी राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी आणि मुलींच्या शिक्षणाकरीता ग्रामीण भागातील रस्ते मजबूत करण्यावरही शासनाचा विशेष भर आहे. मुख्य मंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत रस्ते आणि पाणंद रस्ते वेगाने चांगल्या पध्दतीने तयार करण्याचे कामही सुरु आहे. आगामी काळात शहरासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदललेला दिसेल.
हायब्रिड ॲन्यूइटी अंतर्गत आज शेगाव-नागझरी-मेडशी-डव्हा-मालेगाव-बिबी किनगावजटटु (शेगाव ते पंढरपुर पालखी मार्ग 82.00 कि.मी.), कापशी-बार्शिटाकळी-कारंजा रस्ता (48.00 कि.मी.), वरवट बकाल-वणी वारुळा रास्ता (41.00 कि.मी.), हिवरखेड-तेल्हारा-अडसुळ रस्ता (35.00 कि.मी.), अकोला-म्हैसांग-दर्यापूर रस्ता (जिल्हा सरहद) (43.50 कि.मी.) रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांनी केले. तर आभार कार्यकारी अभियंता गिरीश जोशी यांनी मानले.
अधिक वाचा : लहुजी शक्ती सेनेने केले लोटांगन आंदोलन!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola