अकोला (प्रतिनिधी) : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तक्रार निवारण सभेमुळे सर्वसामान्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण होत असल्याने तक्रारकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सार्वजनिक समस्यांसोबत वैयक्तिक तक्रारींचेही निराकरण होत असल्याने तक्रार निवारण सभा जनतेसाठी दिलासादायक उपक्रम बनला आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर (खिनखिनी) या गावातील विजेचा प्रश्न तातडीने निकाली काढल्याबददल गावकऱ्यांनी आज पालकमंत्री यांचे आभार मानले. या गावात कृषी पंपांसाठी स्वतंत्र डिपी देण्याबरोबरच वाढत्या लोकसंख्येमुळे घरांमधील विजेचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता आणखी एक डिपी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री हर घर बिजली योजनेतंर्गत दलीत वस्तीमधील 46 घरांमध्ये वीजजोडणीकरीता सर्वेक्षणाचे काम सुरु झाल्याबददल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आज झालेल्या तक्रार निवारण सभेत विविध विभागांच्या 375 तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसांच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे, पालकमंत्री यांचे विशेष कार्यअधिकारी उज्ज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सामुहिक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन संबंधीत विभागाच्या अधिका-यांना तक्रारीवर कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी वन्यप्राण्यांकरीता चारा व पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी न्यू विदर्भ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांची वेशभूषा धारण करुन आलेल्या विदयार्थ्यांमार्फत तक्रार सादर केली. अकोला तालुक्यातील मातोडी येथील पंधरा निराधार महिलांना घरकुल मिळावे यासाठी स्वत: या महिलांनी निवेदन दिले. चौहटाबाजार येथील विजय लबडे या तरुणाने स्वयंरोजगारासाठी बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी निवेदन दिले.
दुष्काळामुळे माफ करण्यात आलेले परिक्षा शुल्क महाविदयालयाने घेऊ नये यासाठी बार्शिटाकळी येथील विदयार्थ्यांनी सामुहिकरित्या तक्रार दिली, अशा विविध प्रकारच्या तक्रारी सभेत दाखल झाल्या. या प्रत्येक तक्रारींची स्वत: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दखल घेऊन संबंधीत विभागांना तक्रारीचे निरासरन करण्याबाबत निर्देश दिलेत.
विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग –144 तक्रारी, पोलीस विभाग—22, जिल्हा परिषद– 92, मनपा-22, विद्युत विभाग –15, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-05, भूमी अभिलेख – 15, कृषी विभाग –06, एस.टी. महामंडळ-4, पाटबंधारे विभाग-02, जिल्हा शल्य चिकित्सक-03, जिल्हा अग्रणी बँक –22, जिल्हा विपनण अधिकारी – 4, उपवनसंरक्षक-03, जात पडताळणी समिती-02, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ-01, उपप्रादेशिक प्रदुषण नियंत्रण मंडळ-01, महाबीज-01, औष्णीक विदयुत केंद्र, पारस-01, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-01, सार्वजनिक बांधकाम विभाग-05, आयुक्त भविष्य निर्वाह निधी-02, शासकीय वैदयकीय महाविदयालय-02 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.
प्रारंभी पालकमंत्री यांनी सार्वजनिक प्रश्नांच्या तक्रारी स्विकारल्या. यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.
पालकमंत्री यांनी विभागनिहाय तक्रारी स्विकारल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारकर्त्यांचे म्हणने ऐकून घेत अधिकाऱ्यांना तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 375 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन विभागनिहाय तक्रारी स्विकारल्या.
अधिक वाचा : थकित वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर ग्राहकाचा हल्ला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola