खामगाव (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य पूर्व काळात देशात स्वातंत्र्याची चळवळ राबवत असताना येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयास महात्मा गांधी यांनी २८ डिसेंबर १९३३ रोजी भेट दिली होती. यावेळी त्यांनी चरख्याचे उद्घाटन केले होते.
टिळक राष्ट्रीय विद्यालय हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र असल्याने अनेक स्वातंत्र्य वीरांनी टिळक राष्ट्रीय विद्यालयात भेट देऊन वास्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांनी येथे चरख्याचे उद्घाटन करून संस्थेविषयी स्वतःच्या हस्ताक्षरात अभिप्राय दिल्याचे शाळेच्या अभिलेखामध्ये नमूद आहे. शहरात टिळक राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना २४ जानेवारी १९२१ साली लालचंद पुरवार, पुरुषोत्तम एकबोटे यांच्यासारख्या स्वातंत्र्य प्रेमींनी करून स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र निर्माण केले होते. या विद्यालयाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्रीवर आधारित असल्याने येथे स्वदेशीचा विचार जागृत होता. म्हणून खादी वस्त्र परिधान करणे हा एक विचार असल्यामुळे येथे असलेल्या चरख्याचे उद्घाटन महात्मा गांधी यांनी केले. तसेच परदेशी मालाची होळी करून स्वदेशी वस्त्राचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले होते. यावेळी कलाचार्य पंधे गुरुजी यांच्या सान्निध्यात येऊन महात्मा गांधी येथे निवासी होते. गांधीजींच्या अभिप्रायामध्ये असे लिहिले आहे की, १९२१ साली स्थापन झालेल्या या विद्यालयात मी आज आलो. याचा मला आनंद होत आहे. कारण हे विद्यालय मोठ्या संघर्षामधून जात आहे. मला विश्वास आहे की, या विद्यालयातील शिक्षक पारमार्थिक दृष्टीने कार्य करत विद्यार्थी घडवत आहेत.
विद्यालयाच्या प्रगतीसाठी त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. टिळक राष्ट्रीय विद्यालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहामध्ये गरीब, ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिल्या जात होते. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच तलवारबाजी, दंड बैठका, कुस्ती, कला, क्रीडा व सांस्कृतिक शिक्षण दिले जात होते. गीताई, सफाई, कताई, बुनाई इत्यादी प्रकारचे मूलोद्योग जीवन प्रणालीचे शिक्षण दिले जात होते. देशाच्या सेवेसाठी बलशाली युवक घडावेत व देशाला स्वातंत्र्य प्राप्त करावे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. म्हणूनच मिठाचा सत्याग्रह असेल, गोवा मुक्ती चळवळ असेल अशा अनेक चळवळीत या विद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कार्य केले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी टिळक राष्ट्रीय विद्यालयाचा सहभाग दिसून येतो.
महात्मा गांधीजींसोबतच या थोरांनी दिल्या भेटी
महात्मा गांधी सोबतच माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रल्हाद केशव अत्रे, बालगंधर्व, श्रीमती इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, वसंतराव नाईक, पू. ल.देशपांडे यांच्यासह अनेक थोर पुरुषांनी टिळक राष्ट्रीय विद्यालयास भेटी देऊन गौरवोद्गार काढले आहेत.
अधिक वाचा : जिथे गांधीजींच्या अस्थी झाल्या विसर्जित ते वाघाेली झाले गांधीग्राम; जयंती-पुण्यतिथीला कार्यक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola