अकोला – बदलत्या हवामानानुसार शेतीला समृध्द करणारी तसेच शेतकऱ्यांबरोबर गावाला उन्नत करणारी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना विकासाची नवी नांदी ठरणारी आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. राज्य शासन आणि जागतिक बँकेच्या सहयोगाने शेतीबरोबरच गावाचा कायापालट करणारा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाची तोंडओळख व रुपरेषा प्रशिक्षण कार्यशाळेत पालकमंत्री बोलत होते.
नियोजन भवनात आयोजित या कार्यशाळेस जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यशाळेस सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अकोला जिल्हयातील 498 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.
जिल्हयात प्रथम टप्प्यात 498 गावांपैकी 105 गावांमध्ये प्रकल्पाची अमलबजावणी सन 2017-18 पासून सुरु झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्याची अमलबजावणी करण्यास 328 गावांमध्ये शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने हा प्रकल्प काय, त्याचा उददेश काय आहे, याची माहिती होण्यासाठी सदर कार्यशाळा घेण्यात आली. पालकमंत्री म्हणाले की, दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या हवामानानुसार शेतजमिनीला नवसंजीवणी देण्यासाठी विशेषत: आपल्या जिल्हयातील खारपाणपटटयातील जमीनीचा पोत सुधारण्याकरीता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. या योजनेतंर्गत जिल्हयातील जास्तीतजास्त खारपाणपटटयातील गावे निवडण्यात आली आहे. या प्रकल्पातंर्गत सामुहिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत.
यशस्वी अमलबजावणीसाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषि संजीवनी समितीची संरचना करण्यात आली आहे. समितीत सर्व घटकातील लोकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून गावाचे लोकप्रतिनिधी व अन्य सदस्यांना आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलण्याची मोठी संधी मिळाली आहे. अतिशय महत्त्वाची योजना असणाऱ्या या योजनेतंर्गत राज्यातील निवडण्यात आलेल्या गावातील शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी जागतिक बँकने सुमारे साडेचार हजार कोटी निधी दिला आहे. सहा वर्षे चालणाऱ्या या योजनेसाठी समिती जास्तीतजास्त निधीची मागणी करु शकते.
योजनेसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यात येतो. जर यात कोणत्या गावाला अडचण येत असेल तर प्रशासनातर्फे ऑनलाईन प्रस्तावासाठी मदत करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे परिपूर्ण प्रस्ताव सादर करुन गावांनी या संधीचे सोने करावे. तसेच अधिकाधिक लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा. जिल्हाधिकारी म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी शासन अनेक योजना राबवित आहे. आता शेतजमीन तसेच शेतकरी आणि आपल्या गावाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना प्रकल्पासारखी आणखी एक भक्कम योजना शासनाने दिली आहे.
याअंतर्गत शेतजमीन व वैयक्तिक लाभासाठी मोठयाप्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी सरपंचांच्या खांदयावर मोठी धुरा आहे. त्यामुळे या संधीचे सोने करुन गावाचा विकास साधावा. शेती विकासासाठी या प्रकल्पातंर्गत सामुहिक व वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ सर्वांना मिळण्यासाठी समितीने परिपूर्ण आरखडा तयार करावा. विशेषत: खारपाणपटटयातील जमिनींना पुर्नजिवीत करण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याने ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यशाळेत प्रकल्पाचे विशेष तज्ञ एस.जी. डोंगरे यांनी उपस्थितांना प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्री. निकम यांनी केले.
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलन पश्चिम विदर्भ आयटी सेल प्रमुख पदी इंगोले यांची निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola