अकोला :- येथील स्व. वसंत देसाई क्रीडांगणावर आज सकाळी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना शानदार प्रारंभ झाला. विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. दि. 27 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेनुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी इव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आहेत.
उदघाटन कार्यक्रमास अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. आर.बी. देशमुख, महसुल विभागाचे उपआयुक्त गजेंद्र बावणे आदींसह उपायुक्त स्तरांचे अधिकारी, पाचही जिल्हयातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी तुतारीच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर ढोल व ताशाच्या गजरात, मान्यवरांचे मंचावर आगमन झाले. यावेळी अमरावती आयुक्त कार्यालयासह पाचही जिल्हयातील क्रीडा पथकाने संचलन केले.
मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. याप्रसंगी विविध रंगाचे फुगे आकाशात सोडून स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या हस्ते क्रीडा मशालीने अग्नी प्रज्वलीत करण्यात आला. प्रभात किडसच्या विदयार्थ्यांनी स्वागत गीत गायले. विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले की, महसुल परिवारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महसूल विभाग हा खरं तर प्रशासनाचा कणा आहे. या विभागाला अनेक कामे करावे लागतात. या कामाच्या व्यापातून तणाव हलका होण्यासाठी अशा क्रिडा स्पर्धांची आवश्यकता असते. यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्पर्धेचा आनंदाने आस्वाद घेऊन चांगल्या आठवणी येथून घेऊन जाव्यात.
अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख म्हणाले की, महसूल कर्मचाऱ्यांसाठी अशा क्रिडा स्पर्धा ही एक चांगली पर्वणी आहे. आपले अंगभूत कौशल्य दाखविण्याचे एक व्यासपीठ या स्पर्धेतून मिळते. ही एक चांगली परंपरा आहे. ती अशीच पुढे सुरु ठेवावी. यावेळी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. आर.बी. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, महसूल विभाग हा एक मोठा परिवार आहे. या विभागाला अनेक महत्त्वाची कामे हाताळावी लागतात. या कामाच्या व्यापातून सर्वांचा परस्परांशी संवाद घडवा, विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्षातून एकदा एकत्र यावे, हा क्रिडा स्पर्धेमागील मुख्य हेतू आहे.
दि. 27 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांचा सर्वांनी मनसोक्त आनंद घ्यावा. आगामी काळात आपल्या सर्वांना निवडणुकांना सामोरे जायचे असल्याने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटची जनजागृती व्हावी यासाठी ही स्पर्धा इव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी (निवडणुक) वैशाली देवकर यांनी केले.
क्रीडा स्पर्धा सोबतच दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम 27 डिसेंबर रोजी सांय 5.00 वाजता अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वाशिमच्या जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख बुलढाणाच्या जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे , यवतमाळच्या जिल्हाधिकारी डॉ. आर.बी. देशमुख, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा , अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, महसुल विभागाचे उपआयुक्त गजेंद्र बावणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola