अकोला : शेतकरी हा खऱ्या अर्थाने पोषणकर्ता आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांना स्मार्ट उदयोजक बनविण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासोबतच या योजनांबददल त्यांना अधिकाऱ्यांमार्फत सविस्तर मार्गदर्शन करणे. प्रगतीशील शेतकऱ्यांचे अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे तसेच शेतकरी आणि संबधित विभागांचे अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी एक दिवस शेतकऱ्यांसोबत असा प्रशासनाचा मानस असून दर बुधवारी शेतकऱ्यांकरीता याबाबतची कार्यशाळा नियोजन भवनात राहणार आहे, याचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन स्वत: रोजगारक्षम शेती करुन स्मार्ट उदयोजक बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
रोजगारक्षम शेती व्यवसाय या अंतर्गत ‘शेतकरी हा स्मार्ट उदयोजक’ हा उपक्रम जिल्हा प्रशासनाने आजपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणिया, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शरद वाळके, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. ठाकरे, रेशीम अधिकारी श्री. मानकर यांच्यासह कृषी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांच प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या विविध यंत्रणा कार्यान्वित आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून शेतीसोबत शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील असते, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, रोजगारक्षम शेती व्यवसाय या सदराखाली जिल्हयातील शेतकऱ्यांना आता स्मार्ट उदयोजक बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांकरीता साप्ताहिक मुक्त कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शेतकरी स्वत:च स्वयंभू झाला पाहिजे, हा या मागील उदेश आहे. या कार्यशाळेत कृषी, बँक, नाबार्डचे अधिकारी तसेच प्रगतीशील शेतकरी यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे. दर बुधवारी ही कार्यशाळा नियोजन सभागृहात राहणार असून शेतकऱ्यांमध्ये एक सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याबरोबरच शेतकऱ्यांना उदयोजक बनविण्याचा या मागे हेतू आहे. या कार्यशाळेत मुक्त संवादाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या अडचणी मांडू शकतात.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनात तणाव आहे, त्यामुळे कुठलीही टोकाची भूमिका न घेता खंबीरपणे जीवनाला सामोरे जावे. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती करावी, प्रशासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा त्यांनी दिला. दरम्यान जागतिक मृदा दिनानिमित्त मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आपण जशी आपल्या शरीराची काळजी घेतो, त्याप्रमाणेच आपल्या शेतजमिनीच्या आरोग्याची काळजी प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावी. जमिनीचे माती परिक्षण करुन त्यानुसार जमीनीचे आरोग्य जपण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रारंभी जमीन आरोग्य पत्रिकांचे प्रातिनिधीक स्वरुपात शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये प्रकाश घोडस्कर, सूर्यभान इंगळे, गजानन घोंगे, मनोहर बाबर, विष्णु सोनाग्रे, गणेश घोडस्कर, जनार्दन नांदुरकर, वसंत सोनाग्रे यांचा समावेश होता. जागतिक मृदा दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन श्री. निकम यांनी यावेळी केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांच्यासह श्री. तराणिया, श्री. कुलकर्णी, श्री. वाळके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मृदा चाचणी अधिकारी मिनल म्हस्के, यांनी केले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक नंदू वानखेडे व मंडळ अधिकारी श्री. बोडखे यांनी केले तर श्री. निकम यांनी आभार मानले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola