अकोला – तृणधान्य हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात तृणधान्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच तृणधान्य उत्पादनातही मोठया प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तृणधान्याच्या उत्पादनाला अधिकाधिक प्रोत्साहन देणे आवश्यक असून आहारातही तृणधान्याचा समावेश राहावा, यासाठी प्रत्येकाने तृणधान्यावर भर दयावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
केंद्र शासनाने सन २०१८-१९ हे “राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याचाच भाग म्हणून आज “पौष्टिक तृणधान्य दिन” नियोजन भवनात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल आदींसह कृषी अधिकारी शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, बदलत्या जीवन शैलीमुळे नैसर्गिक जगण्यात कृत्रिमपणा आला आहे. आहारातील पौष्टिकता नाहीसी झाली आहे. तृणधान्य आपल्या आहारात खूप महत्त्वाचे असतात. यामध्ये औषधी गुणधर्मही सामावलेल्या असतात, परंतु इतर नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने तृणधान्य उत्पादनात घट झाली आहे, परिणामी आहारातही तृणधान्याचे प्रमाण घटले आहे. मात्र आता तृणधान्याच्या उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र शासनाने हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यासाठी शासनाने तृणधान्य खरेदी मुल्यातही वाढ केली आहे. अकोला जिल्हयात तृणधान्य वाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. तसेच नागरिकांनी आठवडयातून एक-दोन वेळा आहारात तृणधान्याचा अवश्य समावेश करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
तृणधान्य पिकामध्ये वातावरणातील बदलास सहन करण्याची क्षमता असते. तथापि, बदलत्या हवामान पिक परीस्थितीत तसेच, शेतकऱ्यांना मिळणारे कमी उत्पन्न यामुळे दिवसेंदिवस या पिकाखालील क्षेत्रात घट होत आहे. धावत्या जीवनशैलीत भेडसावणा-या वाढत्या ताण-तणावामुळे व आहाराच्या बदलत्या सवयीमुळे आरोग्यविषयक समस्या जसे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, क्षय, दमा, कर्करोग इ. विकार सध्या विविध वयोगटात निदर्शनास येत आहेत. ज्वारी व बाजरी मध्ये मधुमेह रोधक गुणधर्म आहेत. तसेच, इतर तृणधान्यात ग्लायसेमिक इंडेक्स (GI) चे प्रमाण कमी असल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते, असे संशोधना अंती सिद्ध झाले आहे. त्या अनुषंगाने स्वास्थ आहारात पौष्टिक अन्नधान्याचे महत्व लक्षात येते. यास्तव केंद्र शासनाने सदर पौष्टिक तृणधान्ये व त्याद्वारे पौष्टिक आहारावर भर देण्याचे धोरण अवलंबिले आहे. यावेळी आत्माने प्रकाशित केलेल्या पौष्टीक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व आहारातील महत्त्व या घडीपुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अधिक वाचा : अकोला जिल्हा कबड्डी महासंघ कार्यकारिणी जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola