अकोला (प्रतिनिधी) : राज्य आणि केंद्र शासनाच्या अग्रक्रमाच्या योजना सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी राबविण्यात येत आहेत. घरकुल, पेयजल, सिंचन विहिरी, शेततळे आदी योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने आणि विहित मुदतीत करावी, यासाठी प्रशासनाने ‘मिशन मोड’मध्ये काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
अकोला जिल्हयातील पिकपाणी परिस्थिती, राज्य व केंद्र सरकारच्या अग्रक्रमाच्या योजनांची अंमलबजावणी आणि कायदा व सुव्यवस्था याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सविस्तर आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरीया, गोवर्धन शर्मा, हरीष पिंपळे, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, बळीराम सिरस्कार, अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी आधिकारी कैलास पगारे, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीत मुंबई येथून मुख्य सचिव डी.के. जैन आणि विविध विभागांचे सचिव व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असला तरी पावसाच्या खंडामुळे काही ठिकाणी पिकांची स्थिती समाधानकारक नाही. पाच तालुक्यांत कमी पाऊस झाला आहे. संबंधीत तालुक्यात दुष्काळ परिस्थितीतील उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. येथून पुढे पिक कापणीमध्ये आणेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या भागातही त्या आधारावर दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना लागू करता येतील. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे सात हजार कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
राज्य शासनाने सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचे धोरण प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले आहे. यात जिल्ह्यात उद्दिष्टाच्या 17 हजार 310 घरे मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ५६ टक्के घरकूल पूर्ण झाली आहेत. या कामाला गती देण्यात यावी. त्यासाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांची पदे भरण्यात येतील. बांधकामावर जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष दयावे. प्रत्येकाला घर मिळावे यासाठी विविध अटी शिथील करण्यासोबतच निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी अतिक्रमणे नियमित केल्यानंतर संबंधीतांना त्याच्या मालकीबाबतचे प्रमाणपत्र देण्याची सूचना मुख्यमंत्री यांनी केली.
जलयुक्त शिवार योजनेमुळे 344 गावे जलपूर्ण झाली आहेत. पुढील वर्षीची 144 गावांतील कामे एप्रिलपूर्वीच पूर्ण करावीत. जिल्ह्याला साडेतीन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. यापैकी एक हजार 634 शेततळ्यांचे जिओ टॅगींग झाले आहे. जिओ टॅगिंग झालेल्या सर्व शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसांत अनुदानाची रक्कम उपलब्ध करुन द्यावी, अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात खारपाणपट्टयात शेततळ्यांना वाव आहे. त्यामुळे मागेल त्याला शेततळे आणि नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेतून शेततळे पूर्ण करावेत. कठिण खडक असलेल्या शेततळ्याचे काम रोजगार हमी योजनेतून पूर्ण करता येऊ शकते, कमी पाऊस पडलेल्या तालुक्यात भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे पूर्ण करावीत.
पाच हजार 414 सिंचन विहीरींपैकी तीन हजार 532 विहिरी पूर्ण झाल्या आहे. उर्वरीत विहीरी पूर्ण होण्यासाठी त्रुटी दूर करून गती द्यावी. खारपाणपट्ट्यात विहिरींना कमी वाव असला तरी हाती घेतलेल्या विहिरींची कामे पूर्ण करावीत.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत 114 योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया डिसेंबरमध्ये करून एप्रिलपर्यंत योजना पूर्ण कराव्यात. या कामासाठी निवृत्त उप अभियंता यांची करार पद्धतीने नियुक्ती करावी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्याचे ८३९ किलोमीटरचे उद्दिष्ट जूनपर्यंत पूर्ण करावे. सन 2018-19 मध्ये करावयाच्या कामांचे कार्यआदेश डिसेंबरअखेर देण्यात यावे. यासाठी सध्या सुरू असलेली कामे एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज परतावा योजनेतील कर्जाची हमी राज्य शासनाने घेतली आहे. आजपर्यंतची ही सर्वात चांगली योजना आहे. त्यामुळे महामंडळ आणि बँकांनी आपसात समन्वय ठेऊन सर्व प्रकरणे मंजूर होण्यासाठी प्रयत्न करावेत. मुद्रा योजनेत 75 कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या दोन्हींबाबतीत अधिक काम होण्यास वाव असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा, असे ते म्हणाले.
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याना मुदतीत मिळावी यासाठी प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन होणार नाही. यात विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास संबंधित महाविद्यालयांना जबाबदार ठरविण्यात येईल. याची जाणीव महाविद्यालयांना नोटीस देऊन करण्यात यावी.
जिल्ह्यात बोंडअळीचे 135 कोटी रूपये तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तूर खरेदीचे 115 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. हरभरा खरेदीचे 42 कोटी 72 लाख उपलब्ध करून देण्यात आले आहे. बार्शिटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर खरेदी प्रक्रियेत अनियमितता आढळली आहे. याप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सर्व संबंधितांविरुध्द आजच पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. त्याचा अहवाल उद्याच सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
बळीराजा जलसंजीवनी योजनेत जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी नेरधामनाची घळभरणी जूनपर्यंत करण्यात येणार आहे. घुग्घंशी प्रकल्पाची घळभरणीही यावर्षी करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे देण्यात येणार आहे. नया अंदुरा प्रकल्पातील १९ घरांसाठी अधिग्रहित करण्यात आलेली अकृषक जमिनीचे मूल्य अधिक असल्याने पर्यायी जमिनीचा शोध घ्यावा, असे ते म्हणाले.
अकोला महापालिका क्षेत्रात ४६ हजार रहिवाशांचे घरकूलाचे अर्ज पात्र ठरले आहेत. महापालिकेने हेच आपले उद्दिष्ट मानून त्याप्रमाणे संपूर्ण कार्यवाही करावी. घरांच्या कामासाठी विकास आराखडे तयार करावेत. घरकुलांची कामे महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी लक्ष देऊन पूर्ण करावीत. अतिक्रमणाबाबत मंत्रिमंडळाने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी.
मुख्यमंत्री यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना सुरक्षिततेची भावना निर्माण होणे आवश्यक असून सर्वांनी त्यासाठी काम करावे, असे सांगितले. गुन्हयांचा तपास आणि दोष सिध्दी याबाबत पोलीस यंत्रणा व सरकारी वकील यांनी परस्परांशी वेळोवेळी विचार विनिमय करावा आणि हे प्रमाण वाढीस लागेल याची दक्षता घ्यावी, असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी ‘वावर’ या शेतकरी ते ग्राहक योजनेची माहिती दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा खनीकर्म अधिकारी अतुल दौड, तहसिलदार राहुल तायडे, संतोष अग्रवाल, प्रवीण शिरसाठ, शुद्धोधन जवंजाळ, चंद्रकांत पाटील यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विशाल वानखडे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना शिल्पचित्र भेट दिले.
अधिक वाचा : येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल : मुख्यमंत्र्यांचा दावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola