भारताची अनुभवी महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने जपानच्या नोझुमी ओकुहाराला १७-२१, २१-१६, २१-१२ अशा ३ सरळ सेट्समध्ये पराभव केला. ५८ मिनीटं चाललेल्या सामन्यात सायनाने आपला सर्व अनुभव पणाला लावत ओकुहाराची झुंज मोडून काढली. याआधी उपांत्यपूर्व सामन्यात सायनाने जपानच्याच अकाने यामागुचीला पराभूत केलं होतं.
सलामीच्या सेटमध्ये ओकुहाराने आघाडी घेत चांगली सुरुवात केली होती, काही कालावधीनंतर सायना नेहवाल ने ओकुहाराला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र ओकुहाराने आपली आघाडी कायम ठेवली. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ओकुहाराने आपल्याकडे ११-६ अशी ५ गुणांची आघाडी कायम ठेवली. मध्यांतरानंतर ओकुहाराने काही झटपट गूण मिळवले, सायनानेही यादरम्यान काही चांगले फटके खेळत आपलं अस्तित्व दाखवून दिलं. मात्र ओकुहाराने १७-२१ च्या फरकाने पहिला सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्येही सायना नेहवालने केलेल्या आक्रमक सुरुवातीवर ओकुहाराने पाणी फिरवत सामन्यात आघाडी घेतली. मात्र मध्यांतराच्या दरम्यान ओकुहाराने केलेल्या क्षुल्लक चुकांचा फायदा घेत सायना नेहवाल ने सामन्यात पुनरागमन केलं. यानंतर मध्यांतरानंतर सायनाने आक्रमक फटके खेळत ओकुहाराला कोर्टच्या दोन्ही दिशांना पळवलं, ज्यामुळे ओकुहारा काहीशी दमलेली पहायला मिळाली. अखेर २१-१६ च्या फरकाने सायनाने सेट जिंकत सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं.
तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडू बरोबरीत खेळत होत्या. मात्र सायनाने संधी हेरुन ओकुहारावर दबाव टाकण्यास सुरुवात करत सामन्यात आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये ओकुहारा सायनाचा सामना करु शकली नाही, ज्यामुळे मध्यांतरापर्यंत एकतर्फी खेळात सायनाने ११-३ अशी मोठी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर ओकुहाराने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे हे प्रयत्न सायना नेहवाल ने हाणून पाडत २१-१२ च्या फरकाने सेट जिंकत सामन्यामध्येही बाजी मारली.
अधिक वाचा : Denmark Open 2018 : महिला दुहेरी गटातील अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी जोडी उपांत्यपूर्व फेरीत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola