अकोला(शब्बीर खान)– डेंग्यू, मलेरिया, स्क्रब टायफस या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना आता जिल्ह्यात स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजारानेही प्रवेश केला आहे. एच १ एन १ या विषाणूपासून होणाऱ्या या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यामुळे गायगाव येथील एका ६० वर्षीय इसमाचा शनिवारी मृत्यू झाला. इलीयास खान नवाज खान असे या इसमाचे नाव असून, त्याच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गायगाव येथील इलीयास खान नवाज खान यांना गत आठ दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप आल्याने अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाइन फ्लूसदृश लक्षणे दिसून आल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांच्या विविध तपासण्या केल्या. तसेच त्यांच्या स्वॉबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्यावर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू करण्यात आले; परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली व शनिवार, १५ सप्टेंबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.