तेल्हारा (प्रतिनिधी) : प्रेमाचे नाटक करत विवाहाचे आमिष दाखवून ४३ वर्षीय महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार तेल्हाऱ्यात उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता, महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच आरोपीच्या एका मित्रानेही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी सरदार खान सत्तार खान (वय ४३, रा. दहिगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला) आणि अफरोज खान (रा. धुळे, जि. धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी ‘झिरो’ क्रमांकाने गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी प्रकरण तेल्हारा पोलिसांकडे वर्ग केले आहे.
प्रेमाचे आमिष, विश्वासघाताची परिसीमा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्रथम महिलेची ओळख वाढवत तिचा विश्वास संपादन केला. विवाहाचे आश्वासन देत तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिचे फोटो व व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक छळ सुरू केला. तक्रारीत पीडितेने नमूद केले आहे की, आरोपींनी तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकीही दिली.
आरोपी फरार पोलिसांची शोधमोहीम तीव्र
घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तपास वेगाने सुरू असून लवकरच आरोपींना अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.









