अकोला : दिवाळीच्या काळात मिठायांची वाढती मागणी लक्षात घेता भेसळ आदी गैरप्रकार होऊ नयेत म्हणून अन्न व औषध प्रशासनामार्फत दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत मोहिम हाती घेण्यात आली आहे. ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा’ या उपक्रमाद्वारे सणासुदीनिमित्ताने तुप, तेल, मिठाई, खारे पदार्थ व तत्सम अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांची तपासणी व अन्न नमुने काढण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. अन्नपदार्थांत पालीचे मुंडके, झुरळ आदी आढळल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ने दिवाळी लक्षात घेऊन अधिक व्यापक मोहिम हाती घेतली आहे.
गुलाबजाम, कुंदा, बासुंदी, पेढे, बर्फी, गोड पदार्थांना सणांच्या काळात मागणी असते. कच्चा माल म्हणून खवा वापरला जातो. वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन अनेकजण खव्यात भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचतो. असे प्रकार घडू नयेत अशी मागणी सुराज्य अभियानातर्फेही करण्यात आली होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन पदार्थांत भेसळ होऊ नये म्हणून तपासण्या व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत आजपर्यंत एकूण ५७ अन्न नमुने घेण्यात आले आले आहेत. त्यामध्ये दुध ११, खवा ७, तुप ५, खाद्यतेल ८, मिठाई ७, डायफ्रुड्स ४ व इतर १२ अन्न नमुने घेण्यात आले असून आतापर्यंत ३० पेढींना सुधारणा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, एकूण ६ प्रकरणांत भेसळीच्या संशयावरून १४ हजार ८०८ किलो इतका १९ लक्ष १६ हजार ८७२ रूपये एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त दे. गो. वीर यांनी दिली.