अकोला : मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये कफ सिरप औषधाच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महाराष्ट्रच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. कोल्ड्रिफ सिरप, समुह क्र. एस आर 13 13 निर्मिती दि. मे 2025 कालबाहयता दिंनाक एप्रिल 2027 हे औषध मे. स्त्रेसन फार्मा, कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू यांच्याव्दारे उत्पादित केलेले असून त्यामध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पाश्भुमीवर राज्यातील सर्वसामान्य जनता यांनी तात्काळ या औषधाचा वापर थांबवावा. जर हे औषध कोणाकडे उपलब्ध असले तर ते जवळच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास त्वरित कळवावे किंवा खालील माध्यामातून थेट अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी. टोल फ्री क्र. 1800-222365, ई- मेल [email protected] किंवा मोबाईल क्र. 9892832289 यावर कळवावे.
सदर औषधाचा राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत कारवाई घेण्याकरिता अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य येथील अधिकारी तामिळनाडू, औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहे. राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांना सदर औषधाचा बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो सर्व साठा गोठवावा, अशा सुचना सर्व औषध निरिक्षक व सहायक आयुक्त यांना देण्यात आलेल्या आहेत. अन्न् व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य याबाबत सर्व आवश्यक उपाययोजना करिता आहे. जनतेने सावधनता बाळगावी आणि धोका टाळावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.