मुंबई : संचित तोटा ९ हजारांवर आलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के तिकिटात वाढ (भाडेवाढ) करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. या प्रस्तावावर, गुरुवार २३ जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. भाडेवाढीवर शिक्कामोर्तब झाल्याने शनिवारी (दि. २५) पासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. भाडेवाढ झाल्यानंतर राज्यातील जनतेचा एसटीचा प्रवास ६० ते ८० रुपयांनी महागणार आहे.
एसटी महामंडळ राज्यभरात दररोज सुमारे १४ हजार बसच्या माध्यमातून ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करते. त्यातून महामंडळाला दिवसाला अंदाजे २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु महामंडळाचे महिन्याला मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचे गणित काही बसत नाही. त्यामुळे महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडे तीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला. महामंडळाने राज्य सरकारला १४.१३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी महामंडळाची १७.१७ टक्के भाडेवाढ झाली होती.