मुंबई : रतन टाटा दूरदर्शीपणा असलेले उद्योजक होते, ते दयाळू आणि एक विलक्षण मानव होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व प्रदान केले. अशा श्ब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.
उद्योगजगतातील लखलखता ध्रुवतारा निखळला
ख्यातनाम उद्योजक, भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेले उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन नवल टाटा यांचे बुधवारी (दि.९) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने उद्योगजगतातील लखलखता ध्रुवतारा निखळला आहे. टाटा समूहाचा संपूर्ण कारभार सांभाळणार्या टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी खास निवेदन जारी करत ही दु:खद वार्ता दिली. या वार्तेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 1937 मध्ये मुंबईत जन्म झालेले रतन टाटा हे नाव भारताच्या घराघरांत विश्वासाचे प्रतीक म्हणून घेतले जाते. त्यांच्या निधनाने उद्योगजगताचा लखलखता ध्रुवतारा निखळून पडला आणि ऐन सणासुदीच्या दिवसांत उद्योगजगत शोकाकुल झाले.
लोकांसमोर आदर्श
रतन टाटांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट लिहित म्हटले आहे,” रतन टाटाजी एक दूरदर्शी उद्योजक नेते, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण मानव होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर असे नेतृत्व प्रदान केले. त्याचबरोबर त्यांचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे होते. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अतुट बांधिलकीमुळे त्यांनी अनेक लोकांसमोर आदर्श ठेवला. ”
अनोखी गोष्ट म्हणजे मोठी स्वप्ने
पुढे नरेंद्र मोदी लिहतात, “रतन टाटाजींची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आणि इतरांना काहीतरी देण्याची त्यांची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी, कल्याण या विषयांचा पाठपुरावा करण्यात ते आघाडीवर होते. रतन टाटाजींसोबत झालेल्या माझ्या असंख्य भेटी मला आठवतात. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांना अनेकदा भेटायचो. विविध विषयांवर आमचे विचार विनिमय व्हायचेत. मला त्यांच्या कल्पना खूप उपयुक्त वाटल्या. दिल्लीत आल्यानंतरही या बैठका सुरूच होत्या. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांप्रती मी शोक व्यक्त करतो. ओम शांती.”