अकोला, दि. 26 : येत्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू आहे. त्याअंतर्गत विविध बाबींच्या प्रशिक्षण सत्रांना सुरूवात झाली आहे. त्यात बुधवार व गुरूवारी दोन दिवसांचे प्रशिक्षण सत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ झाला आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी सत्राची आखणी केली असून, निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याशी संबंधित प्रत्येक बाबीचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचा-यांना देण्यात येत आहे.
दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या प्रथम दिवशी नामनिर्देशन, छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया, चिन्हवाटप या विषयावर उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान पथक, मतदान केंद्रे आदीसंबंधी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तर मतमोजणी, पोस्टल बॅलेट, गुगल फॉर्म याबाबत डॉ. रामेश्वर पुरी, श्री. लोणारकर, श्री. जावळे यांनी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांच्या हस्तपुस्तिकेबाबत प्रशिक्षण दिले.
सत्राच्या दुसऱ्या दिवशी आदर्श आचारसंहिता, खर्च संनियंत्रण आदींबाबत उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी, तसेच ‘मिडीया मॅटर्स’बाबत जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी, तर ‘आयटी ॲप्लिकेशन्स’बाबत जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांनी मार्गदर्शन केले. सत्राला निवडणूक यंत्रणेत सहभागी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.