नवी दिल्ली : भारताचे सेमीकंडक्टर मार्केट हे “स्पेशल डायोड” आहे, जे दोन दिशांनी ऊर्जा देते. तुम्ही गुंतवणूक करा, मूल्य निर्माण करा, सरकार तुम्हाला स्थिर धोरणे आणि व्यवसाय करण्यास सुलभता देईल. सेमीकंडक्टर चिप उद्योग एकात्मिक सर्किट्सशी जोडलेला आहे, भारत तुम्हाला एकात्मिक इकोसिस्टम देखील देतो. ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन २०२४ परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सर्वोच्च जागतिक चिप कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना देशातील सेमीकंडक्टर इकोसिस्टममध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान म्हणाले की, भारतात “त्रिमितीय” शक्ती आहे. “पहिले, भारताचे सुधारणावादी सरकार, दुसरे, वाढणारा उत्पादन आधार आणि तिसरे, भारताची महत्त्वाकांक्षी बाजारपेठ. तंत्रज्ञानाची जाण असलेली बाजारपेठ इतरत्र कुठेही मिळणे कठीण आहे. चिप पॉवरहाऊस बनण्यासाठी भारताला या सर्व गोष्टींची गरज आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भारत एकात्मिक वातावरण, स्थिर धोरणे आणि व्यवसाय करणे सुलभ करेल.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी ५०० बिलियन यूएस डॉलरचे लक्ष्य
सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये दीड लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची वचनबद्धता, अनेक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आमचे स्वप्न आहे की जगातील प्रत्येक उपकरणातील चिप भारतात बनलेली असेल. भारताने दशकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी ५०० बिलियन यूएस डॉलरचे लक्ष्य ठेवले आहे.
जगामध्ये डिझाईनिंगमध्ये भारताचे २० टक्के योगदान
जगामध्ये डिझाईनिंगमध्ये भारताचे २० टक्के योगदान आहे. त्याचा सतत विस्तार होत आहे. आम्ही ८५ हजार तंत्रज्ञ, अभियंते आणि संशोधन आणि विकास तज्ञांची सेमी-कंडक्टर वर्कशॉप फोर्स तयार करत आहोत. आपले विद्यार्थी आणि व्यावसायिक सेमीकंडक्टर उद्योग तयार करण्यावर भारताचे लक्ष आहे. ते म्हणाले की, जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाला पुढे नेण्यात भारत मोठी भूमिका बजावत आहे. भारतामध्ये सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा उभारण्यासाठी भारत सरकार ५० टक्के सहाय्य देत आहे. यामध्ये राज्य सरकारही आपापल्या स्तरावर मदत करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
१० वर्षात ८५ हजार तंत्रज्ञ आणि अभियंते तयार होतील
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार येत्या १० वर्षांत भारतात ८५ हजार अभियंते आणि तंत्रज्ञ विकसित करणार आहे. सेमीकंडक्टरवर केंद्रित अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी सरकारने ११३ विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि संशोधन आणि विकास संस्थांशी करार केला असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.