अकोला दि. 2 : पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या महिला पोलीस प्रशिक्षण सत्र क्रमांक ६५ चा दीक्षांत संचलन समारंभ शुक्रवारी झाला. या सत्रातून 737 महिला प्रशिक्षणार्थ्यांनी पूर्ण करून सेवेसाठी सज्ज झाल्या. देशात नवीन फौजदारी कायदा अस्तित्वात आल्यानुसार प्रशिक्षण घेणारी ही पहिलीच तुकडी आहे. समारंभाला आमदार अमोल मिटकरी, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) प्रवीणकुमार पडवळ, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त सुनील लहाने, क्रीडा अधिकारी सतीश भट, आरोग्य सेवामंडळाचे उपसंचालक डॉ. श्रीमती कुलवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महिला प्रशिक्षणार्थ्यांनी प्राप्त ज्ञानाचा वापर करून जनसामान्यांना आपली सेवा प्रदान करावी. तसेच भविष्यात सायबर क्राईम व महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये संवेदनशील भूमिका ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन श्री. पडवळ यांनी केले. सर्व मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्र. प्राचार्य पूनम पाटील यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना शपथ प्रदान केली. दीक्षांत परेडचे नेतृत्व आरती बर्गे यांनी केले. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचा मान पोलीस अंमलदार अश्विनी घारे यांनी पटकावला. या सत्रासाठी प्रा. लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहका-यांनी योगदान दिले. यावेळी केंद्रातील सुविधांबाबत व प्रशिक्षण सत्राबाबत अहवाल वाचनही करण्यात आले.