अकोला,दि. 28 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत शासकीय कार्यालयातील ऑनलाईन प्लेसमेंटमध्ये अकोला जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4 हजार 652 उमेदवारांची विविध शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये निवड झाली आहे. योजनेत अकोला जिल्ह्यात 1 हजार 826 उमेदवार रुजू झाले आहेत. त्यापैकी 1 हजार 744 उमेदवार हे विविध शासकीय कार्यालयांमध्ये रुजू झाले आहेत. या योजनेचे कामकाज ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे. त्यात शासकीय कार्यालयांमध्ये झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन प्लेसमेंटमध्ये अकोला जिल्हा राज्यात गत पंधरवड्यात सतत पहिल्या दोन क्रमांकांमध्ये राहिला असून, अधिकाधिक तरूणांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न होत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी खासगी व्यावसायिक, उद्योजकांची बैठक घेऊन 20 हून अधिक कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांनी योजनेत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4 हजार 652 उमेदवारांची विविध शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये निवड झाली असून त्यापैकी 1 हजार 826 उमेदवार कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयातर्फे आस्थापनांशी सतत संपर्क ठेवून नोंदणीची पूर्तता करून घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी नोंदणी करावी, तसेच रोजगार इच्छुक युवकांनी महास्वयम पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले.