अकोला,दि.26 : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगार, तसेच उच्च शिक्षणासाठी अल्प दराने किंवा बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी विविध योजना इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत आहेत.
२० टक्के बीज भांडवल योजना
ही योजना राज्यातील राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबवली जाते. त्यात महामंडळाचा सहभाग २० टक्के, लाभार्थ्यांचा सहभाग ५ टक्के व बँकेचा सहभाग ७५ टक्के आहे. महत्तम प्रकल्प मर्यादा रु. ५ लक्ष व अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
थेट कर्ज योजना
ही योजना महामंडळामार्फत राबवली जाते. त्यात महत्तम कर्ज मर्यादा १ लक्ष रू. असून परतफेडीचा कालावधी ४ वर्ष आहे. या योजनेत शेतीला पूरक किंवा इतर छोट्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. नियमित परतफेड केल्यास व्याज आकारले जात नाही, परंतु थकित हप्त्यांवर वार्षिक ४ टक्के व्याज दर आकारण्यात येतो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष पर्यंत असावे. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष असावे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
गरजू व कुशल व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धीसाठी ही योजना राज्यातील राष्ट्रीयकृत बँकेमार्फत, तसेच सहकारी बँकेमार्फत राबवली जाते. व्यवसायासाठी मागणीनुसार १ ते १० लक्ष रू. पर्यंत बँकेमार्फत देण्यात येतात. बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थ्याला देण्यात येते. कर्जासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लक्ष रू.पर्यंत असावे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय अभ्याक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता १० ते २० लक्ष रू. इतके महत्तम कर्ज बँकेमार्फत दिले जाते. बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थीला देण्यात येतो. या कर्जासाठी अर्जदार इयत्ता बारावीत ६० टक्के व अधिक गुणांनी उत्तीर्ण असावा. अर्जदाराचे वय १७ ते ३० असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लक्ष पर्यंत असावे.
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील बचत गटातील उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया व मूल्य आधारित उद्योगांसाठी बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या ५ ते १० लक्ष रू. पर्यंतच्या कर्ज रकमेवरील १२ टक्के व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येतो. योजना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकमंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवाशी असावी, वय १८ ते ६० वर्ष असावे. बचत गटाची नोंदणी महिला विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्रात केलेली असावी.
तरी वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी MSOBCFDC.ORG या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, द्वारा किरणराव देशमुख, तापडियानगर, गल्ली क्र. 3, अकोला (दूरध्वनी : ०७२४-२४१०२२१) येथे संपर्क साधावा.