पुणे : दहावी-बारावीत कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे दिसतात. परंतु जन्मत: दिव्यांग असताना दोन्ही हात नसल्यामुळे चक्क पायाने पेपर लिहून उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न बाळगणारा सूरज इच्छाशक्ती दृढ असेल तर संकटांना पुरून ध्येयापर्यंत पोहचता येत असल्याचा संदेश प्रथम वर्ष बीएचे पेपर लिहून देत आहे. सूरज शब्बीर मुजावर याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्र अंतर्गत प्रथम वर्ष बीए या वर्गात श्रीराम शिक्षण महाविद्यालय पाणीव (ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) या अभ्यासकेंद्रामध्ये प्रवेश घेतला आहे.
सूरज हा दुष्काळी भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून तो जन्मतः अपंग आहे. त्याने बारावीनंतरचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. सूरजने मुक्त विद्यापीठाचे परीक्षेचे पेपर पायाने सुंदर व स्वच्छ अक्षरात लिहिले असून जवळपास 13 पानी पेपर सोडविला आहे. अभ्यास केंद्राचे केंद्रप्रमुख व केंद्र संयोजक यांनी विद्यापीठ नियमाप्रमाणे सूरजला लेखनिक, वेळ वाढवून देणे किंवा वेगळा परीक्षा वर्ग देणे या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याची तयारी असतानाही त्याने नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबर स्वतः पेपर लिहिण्याची तयारी दाखवली. मुक्त विद्यापीठामुळे माझे उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न साकार होत आहे याचा मनस्वी आनंद असल्याचे बोलून दाखवले. सूरजच्या जिद्दीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्र- कुलगुरू वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार पुणे, कुलसचिव व परीक्षा नियंत्रक यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.