महाराष्ट्रातील ठाणे, रायगड या जिल्ह्यांसह मुंबईच्या काही भागांमध्ये २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. संपूर्ण पूर्व भारतात पुढील पाच दिवसांत उष्णतेचा प्रकोप जारी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत उष्णतेचा प्रकोप कायम राहणार आहे. गुरुवार, २५ एप्रिलपासून ही लाट देशाच्या इतर भागात पसरण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ओरिसा आणि रायलसीमा क्षेत्रात तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. पश्चिम बंगाल, झारखंडसह विदर्भ, छत्तीसगढ़, दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश, तेलंगाना, आंध्र प्रदेश सीमा, एनम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, छत्तीसगढ़, दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणाच्या विभागात उष्णतेची लाट राहणार आहे.
सहा राज्यांमधील ५८ लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान उष्णतेचा प्रकोप राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम उत्तरप्रदेशातील ८, बिहार मधील ५ पश्चिम बंगालमधील ३,महाराष्ट्रातील ८ कर्नाटकातील १४ आणि केरळ मधील सर्व २० लोकसभा मतदारसंघात होणार आहे. याशिवाय मध्यप्रदेशच्या ७ राजस्थानच्या १३, छ्त्तीसगडच्या २ आणि आसामच्या ५ जागांवर उष्णतेचा प्रकोप राहणार आहे.