पुणे : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व केरळ या पाच राज्यांना उष्णतेचा रेड अलर्ट दिला आहे. या राज्यांत उष्णतेची लाट तीव्र झाली असून दुपारी 12 ते 4 पर्यंत बाहेर पडू नये, असेच वातावरण आहे. दरम्यान, विदर्भात 15 एप्रिल, तर उर्वरित राज्यात 13 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कमाल तापमानाचा भारताचा नकाशा हवामान विभागाने जारी केला. कमाल तापमान संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्तच आहे. त्यातही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ ही राज्ये लाल रंगात दाखवली आहेत तर उर्वरित संपूर्ण देश गडद पिवळ्या रंगात दाखवला आहे.
हिरवा (कमी तापमान) व निळा (खूप कमी तापमान) हे रंगच नकाशातून आता गायब झाले आहेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्या, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हेल्मेट, गॉगल, टोपी, रुमाल, सनकोट हे घालूनच बाहेर पडा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा रेड झोनमध्ये महाराष्ट्रात मध्य, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण हा भाग रेड झोनमध्ये दाखवला आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असणारा विदर्भ प्रथमच कमाल तापमानाचा किंचित मागे असून तो यलो झोनमध्ये दाखवला आहे.
विदर्भात चक्क थंड वातावरण
विदर्भात एप्रिलच्या मध्यावर यंदा पावसामुळे चक्क थंड वातावरण तयार झाले आहे. ज्या भागात पारा 40 ते 44 अंशांवर जातो, तेथील पारा चक्क 30 अंशांवर खाली आला आहे. गुरुवारी वाशिमचे कमाल तापमान 30, बुलडाणा 33, नागपूर 34.8, गोंदिया 35 अंशांवर खाली आले होते. तेथील कमाल तापमानाचा पारा सरासरी 5 अंशांनी खाली आला आहे.
विदर्भात 15, तर उर्वरित राज्यांत 13 पर्यंत पाऊस
राज्यात उष्णतेची लाट तीव्र झालेली असतानाच पावसाचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात पावसाचा मुक्काम 15 एप्रिल, तर उर्वरित राज्यात 13 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
गुरुवारचे कमाल तापमान
मालेगाव 42, पुणे 39.5, अहमदनगर 39.8, जळगाव 38, कोल्हापूर 38.2, मुंबई 33, महाबळेश्वर 33.4, नाशिक 37.8, सांगली 39.9, सातारा 39.1, सोलापूर 40, धाराशिव 39.5, छत्रपती संभाजीनगर 38.6, परभणी 38.3, बीड 40.5, अमरावती 35, बुलडाणा 33.8, चंद्रपूर 36.8, गोंदिया 35, नागपूर 34.8, वर्धा 35, वाशिम 30.2.